
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, ज्यांची सीबीआयकडून लिकर धोरणासंदर्भात चौकशी केली जात आहे. त्यांनी सोमवारी मोठा दावा करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. केंद्रातील सत्ताधारी पक्षाकडून आपल्याला संदेश मिळाला आहे. त्यात म्हटले आहे की त्यांनी ‘आप’ फोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यास त्यांच्यावरील सीबीआय आणि ईडीचे खटले बंद केले जातील, तसेच आपल्याला मुख्यमंत्रीपद देण्यात येईल, असा संदेश आपल्याला भाजपकडून आल्याचा दावा सिसोदिया यांनी केला आहे. तसेच याबाबतचे भाजप नेत्याचे रेकॉर्डिंग आपल्याकडे आहे. गरज भासल्यास ते प्रसारीत करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
आपण भाजपला शरण जाण्यापेक्षा मरण स्वीकारू, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. आपले राजकीय गुरु अरविंद केरीवाल यांच्याशी आपण कधीही गद्दारी करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. माझ्याकडे भाजपचा संदेश आला आहे. आप फोडून भाजपमध्ये या. तुमच्या विरोधातील CBI, ED चे खटले बंद करू, असा दावा त्यांनी केला.
‘मी महाराणा प्रतापांचा वंशज आहे, राजपूत आहे. शिरच्छेद स्वीकारेन पण भ्रष्टाचारी, षडयंत्र रचणाऱ्यांसमोर मान झुकवणार नाही. माझ्याविरोधात सारे खोटे खटले उभे केले आहेत. जे करायचं ते करा.’ कोणत्याही पदाच्या पलोभनामुळे आपण केजरीवाल यांच्याशी गद्दारी करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. देशातील प्रत्येक मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठीच आपण काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. हे काम फक्त केजरीवलाच करू शकतात, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मनोज तिवारी यांचा पलटवार
मनीष सिसोदिया यांच्या या दाव्यावर भाजप नेते मनोज तिवारी यांनी पलटवार केला आहे. सीबीआयने सिसोदिया यांचा मोबाईल जप्त केला आहे. त्यामुळे त्यांना मेसेज कसा आला. त्यांचा फोन सीबीआयने जप्त केल्याची माहिती त्यांनीच दिली आहे. त्यामुळे त्यांना कोणाचा फोन आला किंवा कोणी मेसेज पाठवला, हे त्यांनी स्पष्ट करावे, असे आव्हान तिवारी यांनी दिले आहे.





















































