मांजरा धरण 83 टक्के भरले; तीन जिल्ह्याचा पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न सुटला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परतीच्या पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने धनेगाव ता. केज येथील मांजरा धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर झाली आहे. त्यामुळे धरण आता 83 टक्के भरले असून लातूर, बीड, धाराशीव जिल्ह्यातील पाच शहरांसह अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. तर सिंचनाचा प्रश्नही मार्गी लागल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

224 दलघमी साठवण क्षमतेच्या मांजरा धरणात मे महिन्याच्या अखेरीस केवळ 6.532 दलघमी पाणी साठा शिल्लक राहिल्याने धरण कोरडे पडण्याच्या मार्गावर होते. त्यामुळे जून महिन्याच्या सुरवातीपासून पाणीसाठा वाढण्याच्या दृष्टीने चांगल्या पावसाची अपेक्षा व्यक्त होत होती. लातूर शहर, लातूर एमआयडीसी, अंबाजोगाई, कळंब, केज, धारूर या शहरासह अनेक गावे धरणावर अवलंबून आहेत. जून महिन्यापासून समाधानकारक पाऊस झाला. मात्र विहिरी, बोअरसह नदी, नाले भरण्यास तीन महिन्यांचा कालावधी लागला. तर मांजरा नदीवर असलेल्या बंधारे आणि या नदीला मिळणाऱ्या उपनद्यांवर बंधाऱ्यामुळे मांजरा भरून वाहण्यास पावसाचे तीन महिने प्रतीक्षा करावी लागली. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात धरण मृत साठ्यातून बाहेर आले आहे. त्यामुळे धरणात पाणीसाठा वाढण्याची प्रतीक्षा होती.

सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर असल्याने नदी, नाल्यांना भरती आली. मांजरा नदीच्या पात्रातून पाणी धरणात वाढत गेले. तर परतीच्या पावसाने पाण्याची आवक वाढल्याने 16 ऑक्टोबरपर्यंत दीड महिन्याच्या कालावधीत धरणात 126 दलघमी पाणीसाठा वाढला. त्यामुळे आता धरण 83.58 टक्क्यांपर्यंत भरले असून धरणात आता 187.308 दलघमी इतका पाणीसाठा आहे. परतीचा पाऊस आणखी सुरू असल्याने धरण भरण्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत. तर लातूर शहर, लातूर एमआयडीसी, अंबाजोगाई, कळंब, केज- धारुर या शहरासह बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. तसेच सिंचनाचा प्रश्न मार्गी लागल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.