आशियाई स्थापत्य वैभव – चांदीचे नसलेले रजतमंदिर गिंकाकु-जी

>> डॉ. मंजिरी भालेराव

क्योते या सांस्कृतिकदृष्टय़ा महत्त्वाच्या परिसरात 17 जागतिक वारसा स्मारके आहेत, त्यापैकी एक गिंकाकु-जी मंदिर. याचा अर्थ आहे चांदीचे मंदिर. चांदीचे मंदिर बांधण्याची योजना पूर्ण झाली नसली तरी अवलोकितेश्वराचे स्थान असलेले हे मंदिर याच नावाने ओळखले जाते.

जपानची सांस्कृतिक राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेल्या क्योतोचे थोडेफार महत्त्व आपण मागच्या काही लेखांत पाहिले. या शहराच्या परिसरात जपानचा इतिहास आणि संस्कृतीचे विलोभनीय पुरावे दाखवणारे अनेक अवशेष पहायला मिळतात. खुद्द जपानमधल्या लोकांना या सांस्कृतिक वारशाचा खूप अभिमान आहेच, पण जगभरातून येणारे पर्यटकसुद्धा इथे खूप गर्दी करतात. अशा या सांस्कृतिकदृष्टय़ा महत्त्वाच्या परिसरात आज 17 जागतिक वारसा स्मारके आहेत. त्यापैकी एक म्हणजे गिंकाकु-जी. या मंदिराच्या नावाचा अर्थ आहे चांदीचे मंदिर. जसे सोन्याचा मुलामा असलेले मंदिर या परिसरात आहे तसेच, किंबहुना त्यापासून स्फूर्ती घेऊन चांदीचे मंदिर बांधण्याची योजना झालेली होती, पण दुर्दैवाने ते पूर्ण होऊ शकले नाही. ओशिकागा योशिमित्सुच्या स्मरणार्थ जसे किंकाकु-जी बांधले गेले तसेच त्याचा नातू ओशिकागा आशिकागा योशिमासा याच्या इच्छेखातर या स्थळी गिंकाकु-जी हे मंदिर बांधले गेले. या दोन्ही मंदिर संकुलांच्या विकासातही साम्य आहे. आधी निवृत्तीनंतरचा राजवाडा असलेले हे स्थळ ओशिकागा आशिकागा योशिमासाच्या मृत्यूनंतर एका झेन बौद्ध मंदिरात रूपांतरित झाले. कान्नोन-देन किंवा अवलोकितेश्वराचे स्थान असलेला मंडप हे येथील मुख्य सभागृह आहे. ते दुसऱया मजल्यावर आहे. त्याच्यावर चांदीचा मुलामा लावायची मुळात योजना होती, पण ती कधीच पूर्ण झाली नाही.तरीही त्याच नावाने या मंडपाची प्रसिद्धी झाली आणि आज ते रजत किंवा चांदीचे मंदिर नावाने प्रसिद्ध आहे.

या मंदिराचे मूळ नाव हिगाशियामा जिशो-जी असे आहे. मुरोमाची शोगुनपैकी आठवा शोगुन म्हणजे अशिकागा आशिकागा योशिमासा. तो वयाच्या नवव्या वर्षी कुटुंबप्रमुख झाला आणि वयाच्या पंधराव्या वर्षी शोगुन झाला. त्याने त्याच्या आयुष्यात स्वत:ची सौंदर्यदृष्टी वापरून अनेक स्थळे विकसित केली. साधेपणा हा त्याच्या विचारांचा आणि सौंदर्याच्या संकल्पनेचा स्थायिभाव होता. याच विचारांमधून प्रसिद्ध अशी हिगाशियामा संस्कृती विकसित झाली. यामध्ये जगप्रसिद्ध जपानी चहा पिण्याचा समारंभ, फुलांची सजावट (इकेबाना), बागेची वैशिष्टय़पूर्ण रचना, नोह नाटय़ प्रकार, काव्य तसेच जपानी स्थापत्य यांचा समावेश होतो. या कला खास जपानच्या वैशिष्टय़पूर्ण कला म्हणून पुढे प्रसिद्ध झाल्या, पण त्यांचा उगम या काळात झाला होता. त्याच प्रकारे त्याने आपला हिगाशियामा राजवाडाही बांधला. इ.स. 1460 मध्ये या मंदिराचे बांधकाम करायला सुरुवात झाली, पण मध्ये ओनिन युद्धाच्या काळात यात काही काळ खंड पडला. नंतर परत त्याचे बांधकाम सुरू झाले. इ.स. 1485 मध्ये तो बौद्ध भिक्षू बनला. हिगाशियामा या क्योतोजवळ असलेल्या डोंगररांगा आहेत. या डोंगररांगांना क्योतोच्या सांस्कृतिक इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे.

इ.स.1490 मध्ये अशिकागा आशिकागा योशिमासा याच्या मृत्यूनंतर हा राजवाडा आणि परिसर यांचे रूपांतर झेन बौद्ध मंदिरात झाले. योशिमासा याचे मृत्यूनंतरचे बौद्ध धर्मातील नाव जिशो- इनदोनो होते. त्यावरून या मंदिर संकुलाचे अधिकृत नाव जिशो-जी असे पडले. ते रिन्झाई झेन पंथाच्या शोकोकु शाखेशी संलग्न आहे. रिन्झाई झेन पंथाची शोकोकु ही एक स्वतंत्र शाखा आहे. शोकोकु-जी हे क्योतोमधले एक अतिशय महत्त्वाचे बौद्ध मंदिर आहे. पूर्वी क्योतोमध्ये अनन्यसाधारण महत्त्व असलेली पाच बौद्ध मंदिरे प्रसिद्ध होती. त्यापैकी एक म्हणजे शोकोकु-जी होते. त्या मंदिराची स्थापनासुद्धा अशिकागा आशिकागा योशिमात्सु या आशिकागा योशिमासाच्या आजोबांनी केली होती. त्यांनीच किंकाकु-जी म्हणजे सुवर्णमंदिराचीही रचना केली होती. योशिमासानेही किंकाकु-जी या सुवर्ण मंदिराला एक भेट देऊन त्याप्रमाणे आपल्या मंदिराची रचना करायचे ठरवले. त्याच वेळेस त्याने कान्नोन-देन हे दुसऱया मजल्यावरचे सभागृह चांदीचा मुलामा देऊन सजवायचे ठरवले होते, पण दुर्दैवाने त्याच्या आधीच योशिमासाचा मृत्यू झाला होता. चांदीचा मुलामा देऊन सभागृह सजवण्याचे त्याचे स्वप्न अर्धवटच राहिले, पण पुढेही कोणी ते पूर्ण केले नाही. 16व्या शतकात या परिसरात झालेल्या युद्धात मुख्य इमारत सोडून संकुलातील बाकीच्या सगळ्या इमारती जळून खाक झाल्या. पुढे 17व्या शतकाच्या सुरुवातीला त्याचा मोठय़ा प्रमाणावर जीर्णोद्धार झाला.

या मंदिराच्या परिसरात असलेल्या बागेत हिरवळ, पाणी, खडक अशा गोष्टींचा सुरेख वापर केला आहे, पण सगळ्यात उल्लेखनीय गोष्ट म्हणजे तिथे असलेली पांढरीशुभ्र वाळू ! मंदिराच्या अंगणात पसरलेल्या या वाळूमुळे या मंदिर परिसराचा मनावर एक वेगळाच प्रभाव पडतो. किंकाकु-जी मंदिराच्या छतावर जसा सोनेरी फिनिक्स पक्षी बसवला आहे तसाच इथे चंदेरी फिनिक्स पहायला मिळतो. 1994 साली क्योतोमधील 17 स्मारकांना जागतिक वारसा हा दर्जा मिळाल्यामुळे इथे अशी गर्दी होणे स्वाभाविकच आहे, पण क्योतोमधील मंदिरांच्या आवारातील सुंदर बागांच्या क्रमवारीत गिंकाकु-जीच्या बागेचा क्रमांक बराच वरचा लागतो. त्यामुळेही या परिसरात येणारे पर्यटक चांदीचा मुलामा नसला तरी या रजतमंदिर म्हणून प्रसिद्ध असलेल्या मंदिर संकुलात प्रचंड गर्दी करतात.

[email protected]

(लेखिका टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथे असोसिएट प्रोफेसर ऑफ इंडॉलॉजी आहेत.)