
सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने यंदा कडाक्याची थंडी पडेल असा अंदाज बांधला जात होता. दिवाळीच्या पूर्वसंध्येला हुडहुडी भरणाऱया थंडीने मनमाडकर गारठले होते. त्यानंतर पुन्हा वातावरणात बदल घडत गेला. अगदी काही दिवसांपूर्वी थंडी परतली खरी पण दोन दिवसांत ती गायब झाली. नोव्हेंबर महिना थंडीचा असूनही बदलत्या वातावरणाचा अनुभव देऊन गेला. सध्या मनमाड शहर आणि परिसरात थंडीचे प्रमाण अत्यल्प आहे तर दिवसा वातावरणात उष्मा वाढला आहे. निसर्गानेही बदलत्या वातावरणाची चुणूक दाखवली आहे.
मनमाड परिसरात नोव्हेंबर महिन्यात कडाक्याची थंडी जाणवते, पण यंदा मात्र वेगळेच चित्र पहायला मिळाल़े चक्रीवादळ त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये अवकाळी पावसाचा फटका अशा हवामानातील बदलामुळे नोव्हेंबर महिना थंडीशिवाय सरला. त्यामुळे कडाक्याच्या थंडीची शक्यता वर्तविली जात असतानाच सध्या वातावरणात काहीसा उष्मा जाणवू लागला आहे.
यंदा सलग दुसऱया वर्षी ऑक्टोबरपर्यंत पावसाचा मुक्काम लांबला. राज्यात ऑक्टोबरमधील उष्णता जाणवलीच नाही. मध्यंतरी तर नोव्हेंबरमध्ये उष्मा चांगलाच जाणवत होता. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ापासून वातावरणात काहीसा बदल होईल अशी अपेक्षा होती पण ढगाळ वातावरणामुळे थंडी लांबली आणि दिवाळीच्या पूर्वसंध्येला सुरू झालेल्या थंडीचा जोर पुन्हा मावळला. सध्या पहाटेच्या सुमारास थोडीशी थंडी जाणवते. त्यामुळे मनमाडकरांना पुन्हा एकदा कडाक्याच्या थंडीची प्रतिक्षा आहे.






























































