
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
मी पंतप्रधान असताना यूपीए सरकार आणि काँग्रेसमध्ये कोणतेही मतभेद नव्हते. माझे सरकार रिमोट कंट्रोलवर चालत नव्हते, असे प्रत्युत्तर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान मोदींना दिले. पंतप्रधान मोदी ज्या पद्धतीने बोलतात ते त्यांना शोभत नाही. पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा मोदी राखत नाहीत असा हल्लाबोलही मनमोहन सिंगांनी चढवला.
मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक प्रचारासाठी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग इंदूरला आले आहेत. पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. पंतप्रधानपदावरील व्यक्तीने पदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे, पण मोदी ही प्रतिष्ठा राखत नाहीत. विशेषतः काँग्रेसशासित राज्यांत जाऊन ते खूप बोलतात. ते योग्य नाही असे डॉ. मनमोहन सिंग म्हणाले. डॉ. मनमोहन सिंग यांचे सरकार रिमोट कंट्रोलवर होते अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली होती.
नोटाबंदी ही लूटच
नोटाबंदी ही संघटित लूट असल्याची टीका डॉ. मनमोहन सिंग यांनी संसदेत केली होती. याचा पुनरुच्चार त्यांनी आज केला. नोटाबंदी ही संघटित लूटच आहे. तसेच कोणतीही पूर्वतयारी न करता घाईने जीएसटी लागू करण्यात आली, असा आरोपही त्यांनी केला.
‘राफेल’ करारात ‘दाल में काला’
‘राफेल’ कराराची संयुक्त संसदीय समितीमार्फत (जेपीसी) चौकशी करावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे, पण मोदी सरकार या चौकशीला तयार नाही. त्यामुळे ‘राफेल’ प्रकरणात ‘दाल में काला हैं’ असा आरोप डॉ. सिंग यांनी केला.
मोदींच्या आश्वासनांचे काय झाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक नागरिकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. प्रतिवर्षी 2 कोटी लोकांना रोजगार देतो, असेही आश्वासन दिले होते. या आश्वासनांचे काय झाले? देशात तरुणांना रोजगार मिळत नाही, शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले आहेत, असे डॉ. मनमोहन सिंग यांनी सांगितले.





















































