प्रतिकूल परिस्थितीत बागा जोपासणारे शेतकरी अडचणीत, बदलत्या हवामानाचा फटका; दरामुळे बागा तोट्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माण तालुका दुष्काळी तालुका अशी जुनी ओळख होती. आता फळ बागायतदार तालुका अशी नवी ओळख होऊ लागली आहे. माण तालुक्यातील द्राक्ष, आंबा, डाळिंब, केळी बागायतदार शेतकरी मेटाकुटीला आला आहे. यावर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे उलाढाल ठप्प झाली आहे. बदलते हवामान, अतिवृष्टी, लॉकडाऊन अशी एकामागून एक संकटे शेतकऱ्यांसमोर उभी राहिली आहेत. त्यामुळे बहुतांश फळबाग शेतकरी तोट्यात असून, उत्पादन खर्च मिळणेही कठीण झाले आहे.

यंदा आंबा, डाळिंब व द्राक्षांच्या गुणवत्तेवर परिणाम झालाच आहे; पण थंडीमुळे फळांना थेट तडेच गेल्याने निर्यातीसाठी अडचणी निर्माण होत आहेत. व्यापाऱ्यांकडून मागणीच नसल्याने आता शेतकऱ्यांना स्थानिक बाजारपेठांचाच आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे दर तर कमी मिळणार आहे, पण ओढवलेल्या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना आता अधिकच्या उत्पन्नाची नाही, तर वर्षभर झालेला खर्च तरी भरून निघावा ही अपेक्षा आहे.

थंडीची लाट पसरल्यामुळे मार्केटमध्ये मंदी आली आहे. त्यात सातत्याने बदलत्या हवामानाचा मोठा फटका बसत आहे. परिणामी सध्याची द्राक्षे विक्रीवाचून शेतात पडून आहेत. फ्लॉवरिंगमध्ये गळ आणि कूज यामुळे दहा ते पंधरा टक्के नुकसान झाले. द्राक्ष बागांमध्ये साधारण 60 ते 65 दिवसांनंतर कधीही दावण्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला नव्हता; मात्र यावर्षी 60 दिवसांनंतरही दावण्या रोग बागांमध्ये आढळल्यामुळे सेट झालेल्या मालाचे 50 टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे. यामुळे घड टाकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे उत्पन्नामध्ये घट होऊन खर्चामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. निर्यातक्षम द्राक्ष अवघे 55 ते 66 रुपये, तर लोकल 30 ते 35 रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत असल्याने बागायतदार अडचणीत सापडला आहे. काळचौंडी, पळसावडे, देवापूर, हिंगणी, शेनवडी आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर द्राक्ष पीक घेतले जाते. द्राक्ष लागवडीचा खर्च हा किमान एकरी चार ते पाच लाख रुपये असल्याने प्रथम मोठे भांडवल खर्च करून पीक उभे करावे लागते.

द्राक्षाप्रमाणे केळी व डाळिंब पिकांची अवस्था आहे. निर्यातक्षम केळी 15 रुपये किलोचा दर पाच ते सात रुपये किलो आहे. केळी परवडत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी केळी पिकात नांगर घालून पीक मोडून टाकले आहे. मागील काही वर्षांपासून डाळिंबावरील तेल्या व इतर रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. नैसर्गिक आपत्ती आणि रासायनिक खतांच्या वाढलेल्या भरमसाठ किमती, बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असलेले अनेक फसवी औषधे, मजुरांचा वाढता भाव यामुळे बाग पिकवणे आणि टिकवणे जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे माण तालुक्यातील हजारो एकरांवरील डाळिंब पीक शेतकऱ्यांनी काढून टाकले आहे. अनेक शेतकऱ्यांनी एकरी पाच ते सात लाख रुपये खर्च करून द्राक्ष पिकाची लागवड केली आहे. गेल्या काही वर्षांपासून द्राक्ष उत्पादकांचाही उत्पादन खर्च निघालेला नाही.

शेतकऱ्यांकडून कमी दराने खरेदी; विक्री मात्र चढ्या दरात

मागील वर्षी कोरोनाच्या नावाखाली संपूर्ण देशात आणि राज्यात लॉकडाऊन होते. त्यामुळे फळे, भाजीपाला व इतर पिके मातीमोल किंमतीत व्यापारी खरेदी करून ग्राहकांना मात्र चढ्या भावाने विक्री करीत होते. यंदाही सुरुवातीला अतिवृष्टी व अवकाळी पाऊस या नावाखाली व्यापारी शेतकऱ्यांकडून फळे व इतर माल अतिशय कवडीमोल आणि मातीमोल दराने खरेदी करीत असून, बाजारपेठेत मात्र चढ्या भावाने विक्री सुरू आहे.

नैसर्गिक आपत्ती आणि रासायनिक खतांच्या भरमसाठ वाढलेल्या किमती, औषधे, मजुरांचा वाढता भाव यामुळे बाग पिकवणे आणि टिकवणे जिकिरीचे झाले आहे. अशा परिस्थितीत निर्यातक्षम द्राक्षाला व डाळिंबाला किमान चांगला भाव मिळाला, तर शेतकऱ्यांच्या पदरी चार पैसे शिल्लक राहतील. शेतकऱ्यांचे वर्षाचे आर्थिक गणित हे जोपासलेल्या पिकावर अवलंबून असते.

– शहाजी बाबर, डाळिंब व द्राक्ष उत्पादक शेतकरी, देवापूर, ता. माण.