मनोहर जोशी यांना मरणोत्तर ‘पद्मभूषण’, अशोक सराफ ‘पद्मश्री’ने सन्मानित

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष शिवसेना नेते डॉ. मनोहर जोशी यांना मंगळवारी पद्मभूषण (मरणोत्तर) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचे पुत्र उन्मेष यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते हा पुरस्कार स्वीकारला. राष्ट्रपती भवनात झालेल्या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्यासह सुलेखनकार अच्युत पालव, शास्त्राrय गायिका अश्विनी भिडे देशपांडे, प्रगतीशील शेतकरी सुभाष शर्मा, डॉ. विलास डांगरे या महाराष्ट्रातील पाच मान्यवरांना ‘पद्मश्री’ गौरव प्रदान करण्यात आला. या सोहळय़ात विविध क्षेत्रांतील 68 दिग्गजांना ‘पद्म’ पुरस्कार देण्यात आले. यावेळी उपराष्ट्रपती जगदीप धनकड, पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते.