नांदवी ते वर्षा

मनोहर जोशी यांचा जन्म 2 डिसेंबर 1937 रोजी रायगड जिह्यातील नांदवी या गावात झाला होता. बालपणापासूनच त्यांनी संघर्षाचा सामना केला होता. गरिबीमुळे माधुकरी मागून त्यांनी आपले दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. पुढील शिक्षणासाठी त्यांनी मुंबई गाठली. सहस्रबुद्धे क्लासेसमध्ये शिपायाची नोकरी करून त्यांनी पुढील शिक्षण घेतले होते. त्यानंतर मुंबई महापालिकेत क्लार्क म्हणून नोकरीही केली. वयाच्या 27 व्या वर्षी ते एम. ए., एल. एल. बी झाले. त्यानंतर शिक्षक म्हणूनही त्यांनी काही काळ नोकरी केली. त्याचदरम्यान ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संपका&त आले आणि शिवसेनेत सक्रिय झाले. शिवसेनेत सक्रिय असताना मनोहर जोशी यांनी मुंबई महापालिकेचे नगरसेवक, महापौर, विधान परिषदेचे सदस्य, आमदार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार अशी विविध पदे भूषवली. अत्यंत मुत्सद्दी पण तितकेच विनोदी आणि हजरजबाबी राजकारणी म्हणून त्यांची ख्याती होती.

मनोहर जोशी शिवसेनेत कसे आले?
कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना मनोहर जोशी राजकारणात आले आणि प्रत्येक पावलावर त्यांनी आपली छाप सोडली. 1966 मध्ये शिवसेनेची स्थापना झाली त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मनोहर जोशी यांची साधी ओळखही नव्हती. 1967 च्या डिसेंबर महिन्यात शिवसेनाप्रमुखांची पुण्यात सभा होती. त्यावेळी श्रीकांत ठाकरे बाळासाहेबांची भाषणं रेकॉर्ड करत असत. त्यांनी मुंबईत रेकॉर्ड सिस्टीमची जमवाजमव केली आणि पुण्याला जाण्याची तयारी केली. घरातली कार घेऊन बाळासाहेब आधीच पुण्याला रवाना झाले होते. आता रेकार्ंडगचे सगळे सामान बस किंवा ट्रेनमधून कसे नेणार? हा प्रश्न होता. त्यावेळी यशवंत पाध्ये यांनी मनोहर जोशींना शब्द टाकला. मनोहर जोशींनी कुठलेही आढेवेढे न घेता होकार दिला आणि ते आपल्या कारमधून रेकार्ंडगचं सगळं सामान घेऊन पुण्यात पोहचले. पुण्यातील सभेनंतर श्रीकांत ठाकरे यांनी मनोहर जोशी आणि बाळासाहेबांची भेट शनिवारवाडा परिसरात घडवून आणली. त्यानंतर शिवसेनाप्रमुख आणि मनोहर जोशी यांच्यात चांगली मैत्री झाली आणि मनोहर जोशी शिवसेनेत ‘शिवसैनिक’ म्हणून सक्रिय झाले. शेवटच्या श्वासापर्यंत मनोहर जोशी शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले.

ठाकरे घराण्याच्या चार पिढय़ांचा सहवास
1967 मध्ये ते शिवसेनाप्रमुखांच्या विचारांशी जोडले गेले आणि शिवसेनेत आले ते कायमचेच. मनोहर जोशी यांनी ठाकरे घराण्याच्या चार पिढय़ा पाहिल्या आहेत. प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या सर्वांचा सहवास त्यांना लाभला.