गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती स्थिर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पणजी

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रविवारी दिल्लीतील एम्समधून गोव्यात आले आहेत. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात आले. पक्षाचे सरचिटणीस सदानंद तानावडे यांच्यासोबत आपण त्यांची भेट घेतली. दोन दिवस विश्रांती घेतल्यानंतर त्यांना आराम वाटेल, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर यांनी दिली. पर्रिकर यांच्या प्रकृतीबाबत सुरु असलेल्या चर्चेत काहीही तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितले. भाजप आघाडीचे सरकार स्थिर असून सरकार 5 वर्षाचा कार्यकाल पूर्ण करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पर्रिकर यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी भाजपने सोमवारी कोअर कमिटीसोबत आपल्या आमदारांची बैठक घेऊन चर्चा केली. जनसंपर्क आणि विकास कामे यांची सांगड घालत काम करत राहणे आणि आपला कार्यकाळ पूर्ण करणे हा अजेंडा ठरवण्यात आला आहे. मुख्यमंत्री दोन दिवस विश्रांती घेतल्यानंतर भाजप पदाधिकारी, आमदार आणि मंत्री यांच्याशी संवाद साधणार आहेत. एकीकडे भाजप आपल्या आमदारांसोबत सरकार स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न करत असताना काँग्रेस आमदारांनी पणजीमधील विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्या बंगल्यावर बैठक घेतली. भाजपने विधानसभा विसर्जित केल्यास पुढची रणनीती काय असेल यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. काँग्रेसने 5 वेळा राज्यपालांना सरकारविरोधात निवेदन देऊन त्याची दखल घेतली जात नसल्याने सोमवारी काँग्रेसने राष्ट्रपतींना निवेदन दिले. सध्या सरकार ठप्प असल्याने मोठा पक्ष म्हणून काँग्रेसला सरकार स्थापन करण्याची संधी द्यावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

मुख्यमंत्री पर्रिकर गोव्यात परतल्यानंतर राजकीय हालचाली वाढल्या असून सत्ताधारी भाजप आघाडीसोबत विरोधी काँग्रेस पक्षही वेगवेगळ पर्याय शोधत असून भाजपवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहे.