गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना पॅनक्रिएटिक कॅन्सर; विश्वजीत राणे यांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पणजी

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आजाराबाबत राज्य सरकार आणि भाजप या दोघांनीही माहिती देणे टाळले होते. मात्र, शनिवारी गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी मुख्यमंत्र्यांना पॅनक्रिएटिक कॅन्सर (स्वादुपिंडाचा कर्करोग) झाल्याची माहिती दिली आहे. हळदोणा येथे एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना राणे यांनी ही माहिती दिली. गेल्या साडेआठ महिन्यात पहिल्यांदाच सरकारी यंत्रणेने याबाबतची माहिती दिली आहे. पर्रीकर यांना पॅनक्रिएटिक कॅन्सर आहे, त्यात लपवण्यासारखे काही नाही असे राणे यांनी सांगितले.

पर्रीकर यांची प्रकृती चांगली नाही हे सर्वांना माहीत आहे, एम्समधून त्यांना परत आणले आहे. त्यांना त्यांच्या कुटुंबीयांसोबत शांतपणे राहू द्या असे राणे म्हणाले. त्यांनी राज्यासाठी खूप काही केले आहे, अशा व्यक्तिला आपल्या कुटुंबीयांसोबत राहण्याचा वेळ देण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. काँग्रेस मुख्यमंत्र्याच्या आरोग्याविषयी तर्कविर्तक करत आहेत. जितेंद्र देशप्रभू यांनी न्यायालयात जाण्याचेही म्हटले आहे. त्यांना जायचे असेल तर त्यांनी न्यायालयात जावे, काँग्रेसकडे मुद्दा नाही म्हणून ते पर्रीकर यांच्या आरोग्याविषयी बोलत आहेत असे राणे म्हणाले.