मराठा आरक्षणासाठी पुन्हा 4 जूनपासून उपोषण, मनोज जरांगे पाटील यांचा निर्धार

लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशीच अर्थात 4 जूनपासून मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा आंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. राज्य सरकारने दिलेल्या 10 टक्के आरक्षणाचा मराठा समाजाला कवडीचाही फायदा होत नसल्याचा स्पष्ट आरोपही त्यांनी यावेळी केला. दरम्यान, 8 जून रोजी नारायणगड येथे जाहीर सभा होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

छत्रपती संभाजी महाराजांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी मनोज जरांगे हे शहरात आले होते. बुलंद छावा संघटनेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे यांनी उपोषणाबद्दल माहिती दिली. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मी लढा उभारला आहे. राज्य सरकारने 10 टक्के आरक्षण देऊन मराठ्यांची फसवणूकच केली आहे. या आरक्षणाचा समाजाला कोणताही फायदा होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मुळात हे सरकारचे आरक्षण अद्याप लागूच झालेले नाही. त्यामुळे ओबीसी प्रवर्गातून सरसकट आरक्षणाच्या मागणीवर आपण ठाम असून त्यासाठी 4 जून रोजी आंतरवालीत बेमुदत उपोषण सुरू करणार असल्याचे ते म्हणाले. 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल आहे. सकाळी 9 वाजता उपोषणाला प्रारंभ होईल, असेही त्यांनी सांगितले. मराठा समाजाला आंदोलनाची पार्श्वभूमी माहिती आहे. माझे उपोषण सुरू झाल्यानंतर राज्यातील गावागावातही मराठा समाजाचे आंदोलन शांततेत सुरू होईल, असे मनोज जरांगे म्हणाले.

फडणवीसांमुळेच मोदींवर वणवण करण्याची वेळ

मराठा आरक्षणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मराठा समाजाने झुकवले आहे. पंतप्रधानांना एकेका जिल्ह्यात तीन तीन सभा घ्याव्या लागत आहेत. महाराष्ट्रात ते घोंगडी घेऊनच आले होते, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली. मोदी पत्रकारांशी बोलले नाहीत, पण तासन् तास भाषणं मात्र त्यांनी ठोकली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यामुळेच मोदींवर वणवण करण्याची वेळ आल्याचा आरोप जरांगे यांनी केला.

आरक्षणाच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास विधानसभा लढवणार
मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न जर राज्य सरकारने सोडवला नाही तर किंवा त्याकडे दुर्लक्ष केले तर आगामी काळात होणारी विधानसभेची निवडणूक ताकदीनिशी लढवणार असल्याची घोषणाही यावेळी मनोज जरांगे यांनी केली. विधानसभेच्या 288 जागा लढवल्या जातील. समाजातील सर्व जातीमधील गोरगरिबांना प्रस्थापितांच्या विरोधात उभे करण्यात येईल. प्रस्थापित तीन टक्के मराठा समाजाला बाजूला सारून ही निवडणूक लढवली जाईल, असेही ते म्हणाले.