मराठा एक झाल्यास दोन तासांत आरक्षण; मनोज जरांगे- पाटील यांचा विश्वास

आमचे आमदार, खासदार एकत्र असते तर दोन तासांत आरक्षण मिळाले असते, असा विश्वास व्यक्त करत मराठा आरक्षणासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा, असे आवाहन आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे -पाटील यांनी जळगाव येथील सभेत केले. यावेळी त्यांनी राज्यातील मिंधे सरकार आणि महामानवांच्या जाती काढणारा येवल्याचा पहिलाच मंत्री म्हणत त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला.

मनोज जरांगे-पाटील यांच्या आज जळगाव जिह्यातील चाळीसगाव, अंमळनेर आणि जळगाव येथे मोठय़ा सभा झाल्या. सायंकाळी जळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळय़ाजवळ झालेल्या सभेत जरांगे पाटील यांनी सरकारवर जोरदार आसूड ओढले. मराठा आरक्षण मिळू नये, यासाठी अनेकांचा विरोध आहे. मात्र, समाजात फूट फडू देऊ नका, तेढ निर्माण होवू देऊ नका. एकत्र येऊन लढा, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

राज्य सरकार आपल्याशी धोकेबाजी करू शकत नाही. सरकारला आरक्षण द्यावेच लागेल. कारण मराठा समाजबांधवांच्या शासकीय नोंदी मोठय़ा प्रमाणात सापडल्या असून, आपल्याला आरक्षणापासून कोणीही रोखू शकत नाही. ज्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांना लगेच प्रमाणपत्र देण्याचे सरकारने ठरविले आहे व तसा शब्दही दिला आहे, असे ते म्हणाले.

या भव्य जाहीर सभेत जिह्याच्या कानाकोपऱयातून मराठा समाजबांधव उपस्थित होते.

24 डिसेंबरपर्यंत शांत बसा
आतापर्यंत मराठा समाजाच्या 32 लाख नोंदणी महाराष्ट्रात सापडल्या असून, हे आपल्या आंदोलनाचे यश आहे, असे सांगत 24 डिसेंबरपर्यंत शांत बसा, आरक्षणासाठी मराठी लेकरं तुम्हाला साद घालत आहेत. आरक्षण मिळेपर्यंत सर्वांनी एकत्र येऊन मराठा समाजाची एकजूट राज्यकर्त्यांना पुन्हा एकदा दाखवून द्या, असे आवाहनही त्यांनी केले.