कोर्टाचे नाव सांगून कारवाई नको! जरांगे-पाटलांनी मिंधे सरकारला थेट हायकोर्टातच दिला इशारा

कोर्टाचे नाव सांगून कारवाई करू नका. तुम्हाला अधिकार आहेत ना. मग तुम्ही थेट कारवाई करा, असा इशारा मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱया मनोज जरांगे-पाटलांनी मिंधे सरकारला गुरुवारी उच्च न्यायालयात दिला. मराठा आंदोलन शांततेत करणार असल्याची हमी जरांगे-पाटलांच्या वतीने न्यायालयात देण्यात आली.

जरांगे-पाटलांच्या आंदोलनाला गुणरत्न सदावर्ते यांनी याचिका दाखल करून आव्हान दिले आहे. न्या. अजय गडकरी व न्या. शाम चांडक यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. या याचिकेवर तातडीने सुनावणी घ्यावी, असा अर्जच मिंधे सरकारच्यावतीने करण्यात आला. त्यावर जरांगे-पाटलांचे वकील व्ही.एम. थोरात यांनी आक्षेप घेतला.

नवी मुंबई येथे सरकार आम्हाला भेटले. आमच्याशी चर्चा केली. नंतर सांगण्यात येते की, न्यायालयाच्या आदेशामुळे कारवाई करतो आहोत. एवढे करायची गरज नाही. तुम्हाला अधिकार आहेत. मग तुम्ही थेट सांगा ना आम्ही कारवाई करतोय, असे सांगत अॅड. थोरात यांनी मिंधे सरकारच्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण जाहीर झाल्यानंतर जरांगे-पाटलांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. चौका-चौकात आंदोलन करा. रास्ता रोको करा, असे आवाहन जरांगे-पाटलांनी केले आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले.

विवाह सोहळे पुढे ढकला. आंदोलन करा, असे जरांगे-पाटलांनी कार्यकर्त्यांना सांगितले असल्याची माहिती सदावर्ते यांनी खंडपीठाला दिली. याबाबत तुमचे काय म्हणणे आहे. तुम्ही तुमचे आंदोलन शांततेत करणार का, अशी विचारणा न्यायालयाने जरांगे-पाटलांच्या वकिलांना केली. त्यावर वरील अॅड. थोरात यांनी वरील हमी दिली.

एकाला दोष देणे योग्य नाही
मराठा आरक्षणासाठी समितीद्वारे आंदोलन केले जात आहे. पाच हजार लोकांनी हे आंदोलन पुकारले आहे. त्याचा दोष एकावर लावणे योग्य नाही. तरीही जरांगे-पाटलांकडून शांततेत आंदोलन केले जाईल. कोर्टाच्या किंवा याचिकाकर्त्याच्या आडून कारवाई करण्यापेक्षा सरकारने थेटच कारवाई करावी, असा युक्तिवाद अॅड. थोरात यांनी केला. जरांगे-पाटलांकडून शांततेत आंदोलन केले जाईल याची नोंद करून घेत न्यायालयाने ही सुनावणी 26 फेब्रुवारी 2024पर्यंत तहकूब केली.

शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन, बारावीच्या विद्यार्थ्यांची काळजी घेण्याची सूचना

वडीगोद्री – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शनिवारपासून गावागावांत शांततेने रास्ता रोको करा, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले आहे. बारावीची परीक्षा सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, असेही जरांगे म्हणाले.

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे, सग्यासोयऱयांच्या अध्यादेशात स्पष्टता आणावी तसेच मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत यासाठी मनोज जरांगे यांनी 24 फेब्रुवारीपासून पुन्हा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात शनिवारी राज्यातील सर्व गावांमध्ये सकाळी 10.30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत रास्ता रोको करण्यात येणार आहे. मराठा कार्यकर्त्यांनी शांततेत आंदोलन करावे, कोणतेही लांच्छन लागता कामा नये, असेही त्यांनी बजावले.

अजित पवार कधीही समाजाच्या बाजूने बोलत नाहीत
उपमुख्यमंत्री अजित पवार हे छत्रपती संभाजीनगर दौऱयावर आले होते. मार्चच्या पहिल्या आठवडय़ात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते, असे ते म्हणाले. अजित पवार हे कधीही धोरणाचे बोलत नाहीत. समाजाबद्दल ते काही बोलल्याचे आठवत नाही. त्यांच्याकडून अपेक्षा करणे चुकीचे आहे, असेही ते म्हणाले.

जरांगेंवर आरोप करणाऱया बारस्करांवर हल्ल्याचा प्रयत्न
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप करणाऱया अजय बारस्कर महाराज यांच्यावर मराठा आंदोलकांकडून हल्लाचा प्रयत्न झाला आहे. चर्चगेट परिसरात शुक्रवारी रात्री ही घटना घडली असून याप्रकरणी दोघा जणांना मरिन ड्राईव्ह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.