देवेंद्र फडणवीस, कुणालाही अंगावर घालू नका, नसता लोकसभेत दाखवला तसा विधानसभेत पुन्हा इंगा दाखवेन, असा थेट इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी दिला आहे. लोकसभेच्या निकालानंतर तरी सरकारने जागे व्हावे आणि मराठय़ांना आरक्षण द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
बीड लोकसभा मतदारसंघात अटीतटीच्या लढाईत विजय मिळवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी आंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांची भेट घेतली. या वेळी पत्रकारांशी बोलताना जरांगे यांनी मराठा आरक्षणावरून राज्य सरकारला धारेवर धरले. मराठा समाजाच्या न्याय्य मागणीकडे दुर्लक्ष केल्याचे परिणाम लोकसभेत दिसून आले आहेत. या निवडणुकीत मराठा समाज एकवटला आणि त्याने आपली ताकद दाखवून दिली, असे जरांगे म्हणाले. आरक्षणाबाबत आता तरी सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आरक्षण न दिल्यास मराठा समाज विधानसभेच्या 288 जागा लढवेल, असा इशाराही त्यांनी दिला.