मुंबईला न येण्यासाठी पोलिसांची जरांगेंना नोटीस, मोर्चा मुंबईच्या दिशेने निघाला

मराठा समाजाचं वादळ लोणावळ्यातून मुंबईच्या दिशेने सरकलं आहे. मुंबईतील जमावबंदी, न्यायालयाचे आदेश यामुळे मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी जरांगे पाटील यांना गुरुवारी नोटीस बजावली. मुंबईमध्ये जरांगे यांनी मोर्चा घेऊन येऊ नये आणि इथे आंदोलन करू नये यासाठी ही नोटीस देण्यात आली. मात्र तरीही जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम असून मराठा समाजाचा मोर्चा मुंबईच्या दिशेने निघाला आहे.

मनोज जरांगे पाटील यांची आणि छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकर अर्दाड यांची लोणावळ्यात बंद दाराआड चर्चा झाली. ही चर्चा बंददाराआड का झाली असा प्रश्न विचारला असता जरांगे यांनी म्हटले की ते त्यावेळी जेवण करत होते त्यामुळे ही चर्चा घरामध्ये झाली आणि त्याचा कोणताही चुकीचा अर्थ काढला जाऊ नये. जरांगे यांनी सरकारला उद्देशून बोलताना म्हटले की या प्रश्नावर तोडगा काढायचा असेल तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार या तिघांनी येऊन चर्चा करावी.