फडणवीसांनी शहाणं व्हावं, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

देवेंद्र फडणवीस मराठ्यांच्या अंगावर मराठे घालत आहेत. त्यांनी आताच शहाणं व्हावं नसता मी सगळं बाहेर काढणार. आता त्यांचा सामना मराठ्यांशी आहे, अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी आज रविवारी उपमुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधला. एकदा आरक्षण मिळालं की, आपण मोकळे. ‘तो’ आणि आपण एकाच गल्लीत आहोत. ‘आरक्षण मिळाल्यावर तू फक्त बाहेर निघ म्हणा,’ असा इशाराही त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांना दिला.

आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण तापत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलनकर्ते मनोज जरांगे राज्यभर सभा घेत आहेत. सध्या ते लातूर जिल्हा दौर्‍यावर आहेत. आज लातूर दौर्‍यात त्यांच्या किल्लारी आणि औसा येथे जाहीर सभा झाल्या. या सभांमध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

अन्यथा मराठ्यांशी सामना

ते म्हणाले की, मराठा समाज सध्या शांत आहे. देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की, आम्हाला शांत राहू द्या. तुमच्या डोक्यातील विषारी विचार मराठा नेत्यांच्या डोक्यात ओतू नका आणि त्यांच्या माध्यमातून लोकांमध्ये कलह निर्माण करू नका, अन्यथा तुमचा सामना मराठ्यांशी आहे. फडणवीस यांनी आधी मोठेपणा दाखविला होता, त्यामुळे त्यांच्यावर विश्वास बसायला लागला होता. आता त्यांनी पुन्हा खोड्या सुरू केल्या आहेत. मराठा आरक्षणाविरोधात जे बोलत आहेत, त्यात भाजपमधीलच काही मराठा नेतेही आहेत, जे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आहेत. त्यामुळे फडणवीसांनी या नेत्यांना समज द्यावी, नाहीतर उघडपणे भूमिका जाहीर करावी. मग आम्हीही बघून घेऊ. या नेत्यांना आवरलं नाही तर आम्ही तुमचं सगळंच बाहेर काढू, असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला आहे.

मराठे काय आहेत हे दाखवून देऊ

फडणवीस मराठ्यांच्या अंगावर मराठे घालत आहेत. आम्ही त्यांचा डाव उधळून लावू, असेही जरांगे म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा तरुणांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांबाबत जी भूमिका घेतलीय, त्यात बदल करावा अन्यथा अधिवेशनानंतर मराठे काय आहेत हे त्यांना दाखवून देऊ, असा इशाराही मनोज जरांगे पाटलांनी दिला आहे.

भुजबळांना त्यांची जागा दाखवून देऊ

औसा येथील सभेत त्यांनी भुजबळांना लक्ष्य केले. ते म्हणाले की, मराठा आणि ओबीसी समाजात भांडण लावण्याचे काम छगन भुजबळ करीत आहेत. त्यांचे आता वय झालेले आहे, त्यांचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे. अशा माणसावर मराठा व ओबीसींच्या नागरिकांनी विश्वास ठेवू नये. पूर्वीपासूनच ओबीसी व मराठाबांधव एकमेकांवर जिवापाड प्रेम करीत आलेला आहे आणि येणार्‍या काळातही असेच प्रेम आपण कायम ठेवावे. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत मी शांत बसणार नाही आणि त्यासाठी आपली एकजूट महत्त्वाची आहे. आपणाला आरक्षण मिळाल्यावर याच छगन भुजबळांना त्यांची जागा दाखवून देऊ, असे आव्हानदेखील जरांगे यांनी दिले.

आता आर-पारची लढाई

औसा येथील सभेत त्यांनी मिंधे सरकारवर जोरदार निशाणा साधला. या सरकारला जनाची नाही तर मनाची जरी लाज वाटत असेल तर हे सरकार मराठ्यांना आरक्षण देईल. परंतु, ते केवळ वेळकाढूपणा करत असल्याचे आता सिद्ध झालेले आहे. आतापर्यंत सरकारने दिलेला शब्द पाळळेला नाही आणि आता आपणाला आर-पारची लढाई सुरू केल्याशिवाय हे कुंभकर्णाच्या औलादीचे सरकार आपणाला आरक्षण देणार नाही.

मराठा आरक्षण मिळू नये, यासाठी याच मिंधे सरकारने ओबीसीच्या एका नेत्याला पुढे केलेले आहे. तो फक्त वादग्रस्त वक्तव्ये करून आपल्या समाजात कशी फूट पडेल, याची वाट बघत आहे. ‘अरे वेड्या, तुझ्या सात पिढ्या जरी जन्माला आल्या, तरी आता या मराठा समाजात फूट पडणार नाही, हे नेहमी लक्षात ठेव. अशाच प्रकारचे राजकारण या राज्यकर्ते मंडळीने केलेले आहे. परंतु, आता संपूर्ण मराठाबांधव एकवटला आहे आणि येणार्‍या काळातही असाच एकवटलेला दिसेल. आपल्यात फूट पाडण्यासाठी अनेक जणांना या सरकारने कामाला लावलेले आहे. त्यामुळे समाजात फूट पडू देऊ नका, तेढ निर्माण होऊ देऊ नका, एकत्र येऊन लढा,’ असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

निलंगा येथील सभेत जरांगे म्हणाले की, 1805 पासून ते 1967 ते 2023 पर्यंत मराठ्यांच्या नोंदी सापडल्या. मात्र, त्या सापडू दिल्या नाहीत. कोणत्या नेत्यांनी या नोंदी झाकून ठेवल्या, याचा शोध घेणे गरजेचे आहे. दिलेले आरक्षण हे कोणत्या निकषांवर दिले. १९९० साली ओबीसींना १४ टक्के आरक्षण देण्यात आले. त्यानंतर 4 वर्षांनी म्हणजे 1994 ला हेच 30 टक्क्यांवर झाले. ते कसे झाले, यासाठी कोणता निकष वापरला व कुठल्या जनगणनेचा आधार घेतला, असा सवालही जरांगे पाटील यांनी उपस्थित केला. 1931 च्या ब्रिटिश जनगणनेनुसार केलेल्या नोंदी उचलून त्या व्ही.पी. सिंग सरकारच्या पुढे ठेवण्यात आल्या खर्‍या, पण नोंदी न घेताच आरक्षण देण्यात आले. एकदा आपणाला आरक्षण मिळाले की, जेलमध्ये बेसन भाकरी खाल्लेल्या छगन भुजबळांना त्यांची जागा दाखवून देऊ, असेही त्यांनी सांगितले.

सरकारने आपणाला 24 डिसेंबरपर्यंतची मुदत दिलेली आहे. त्यामुळे आपणाला हे सरकार नक्की आरक्षण देईल. फक्त आपली एकजूट आणि संयम ठेवा, अशीच एकजूट कायम आपणाला ठेवावी लागेल. आपण आपल्या 17 तारखेच्या बैठकीत आंदोलनाची दिशा ठरविणार आहोत. शासनाने आपल्याकडून तीन वेळेस वेळ वाढवून घेतलेली आहे आणि आता ती शेवटचीच आहे, असेही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले.