अंतरवाली सराटी येथे 4 जून पासून कठोर उपोषण, मनोज जरांगे पाटील यांचा निर्धार

मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटी येथे उपोषण करण्याची 4 जून ही तारीख तीन महिन्यापूर्वीच ठरली आहे, या तारखेत कुठलाही बदल होणार नाही. आंतरवली सराटी येथे बेमुदत उपोषण केले जाणार असल्याचा निर्धार मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला. जरांगे पाटील यांच्यावर शहरातील गॅलेक्सी हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान आज सोमवारी प्रसार माध्यमांशी त्यांनी संवाद साधला.

जरांगे पाटील पुढे म्हणाले, तुम्ही कितीही एसआयटी लावा, आरोप करा, गुन्हे दाखल करा. मात्र तुम्हाला मराठा समाजाची खरी एकजूट , ताकद चार जूनच्या उपोषणातून दिसून येईल असा गर्भित इशारा त्यांनी सरकारला दिला.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण आणि सग्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी हा लढा सुरू आहे, असे त्यांनी यावेळी नमूद केले. मी कुठलाही जातिवाद केलेला नाही व मराठा ओबीसी समाजात जातीय तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केलेले नाही, असे असताना ओबीसी नेते मात्र मला जातीयवादी ठरवण्याचा प्रयत्न करीत आहेत. असा टोला नाव न घेता मंत्री धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांना लगावला.

निवडणूक मतदान होईपर्यंत मी जातीयवादी नव्हतो आणि मतदान झाल्यानंतर मला जातीयवादी ठरवण्याचा प्रयत्न ही मंडळी करत आहे. मात्र गाव खेड्यात मी कधी जातीवाद केला नाही, करणार नाही. त्यांनाच ही निवडणूक जातीवर न्यायची होती असाही आरोप त्यांनी ओबीसी नेत्यांवर केला.

प्रमाणपत्र देण्यास अधिकाऱ्यांची टाळाटाळ

कुणबीच्या नोंदी प्राप्त झालेल्या मराठा समाजाला प्रमाणपत्र देण्यास विलंब होत असल्याबद्दल विचारले असता, जरांगे पाटील म्हणाले काही ठिकाणी अधिकारी मनमानी करत असून प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करत आहेत मात्र या संदर्भात विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांची आपण गेल्या आठवड्यात भेट घेतली. तेव्हा ते बोलले, मनुष्यबळ निवडणुकीत व्यस्त असल्याने प्रमाणपत्राला थोडा विलंब होत असून 20 तारखेपासून प्रमाणपत्र देण्या ची प्रक्रिया गतीने सुरू होईल, असा शब्द त्यांनी दिला आहे असेही जरांगे पाटील म्हणाले.