अजित पवारांनी धनंजय मुंडेंना पाठिशी घालू नये, 2029ला वाईट करेन; मनोज जरांगेंचा इशारा

अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना पाठिशी घालू नये. 2029ला वाईट करेन, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिला आहे. आज बीडमध्ये माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत. माझ्या घातपाताचा विषय ठरला होता असं म्हणत मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना पाठीशी घालणे सुरूच ठेवले, तर त्याचे वाईट परिणाम होतील आणि 2029 मध्ये त्यांना मोठा पश्चाताप करावा लागेल.”

दरम्यान, अलीकडेच आमदार धनंजय मुंडे यांनी त्यांच्यासह मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंगची मागणी केली होती. ते आव्हान मनोज जरांगे यांनी स्वीकारले होते. धनंजय मुंडे, माझी, माझ्या खुनाचा कट रचणारे आरोपी, या सर्वांचीच नार्को टेस्ट व ब्रेन मॅपिंग करण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन दिले होते. या नार्को टेस्टमुळे संतोष देशमुख, महादेव मुंडे, गीते व इतर काही प्रकरणात धनंजय मुंडे क्रिमिनल माईंड आहेत. हे किमान माझ्यामुळे तरी उघडकीस येईल, असे आंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले होते.

ते म्हणाले होते की, कर नाही त्याला डर कशाला? त्या सामूहिक कटाचा सूत्रधार धनंजय मुंडे असेल. आमचे लोक हाताखाली धरायचे, पुन्हा आमच्या विरोधात त्यांचा वापर करायचा आणि खोटं सांगायचं ते लोक त्यांचेच आहे म्हणून. तुझी खोडच मोडायची आहे.