खोड्या थांबवा, शहाणे बना, नाहीतर सगळं बाहेर काढेन; जरांगे यांचा फडणवीसांना इशारा

देवेंद्र फडणवीस मराठय़ांच्या अंगावर मराठे घालत आहेत. त्यांनी आताच शहाणं व्हावं, खोडय़ा थांबवाव्यात अन्यथा मी सगळं बाहेर काढणार. आता त्यांचा सामना मराठय़ांशी आहे, अशा शब्दांत मनोज जरांगे-पाटील यांनी आज रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. एकदा आरक्षण मिळालं की, आपण मोकळे. ‘तो’ आणि आपण एकाच गल्लीत आहोत. ‘आरक्षण मिळाल्यावर तू फक्त बाहेर निघच,’ असा इशारा त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांना दिला.

आरक्षणाच्या मुद्दय़ावरून राज्यातील वातावरण तापत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावर आंदोलनकर्ते मनोज जरांगे राज्यभर सभा घेत आहेत. सध्या ते लातूर दौऱयावर आहेत. आज लातूर दौऱयात त्यांच्या किल्लारी आणि औसा येथे जाहीर सभा झाल्या. या सभांमध्ये त्यांनी फडणवीस आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला.

…अन्यथा मराठय़ांशी सामना

ते म्हणाले की, मराठा समाज सध्या शांत आहे. देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की, आम्हाला शांत राहू द्या. तुमच्या डोक्यातील विषारी विचार मराठा नेत्यांच्या डोक्यात ओतू नका आणि त्यांच्या माध्यमातून लोकांमध्ये कलह निर्माण करू नका, अन्यथा सामना मराठय़ांशी आहे. मराठा आरक्षणाविरोधात बोलणाऱयांमध्ये भाजपमधीलच काही मराठा नेतेही आहेत, या नेत्यांना आवरलं नाही तर तुमचं सगळंच बाहेर काढू, असा इशाराही जरांगे यांनी दिला आहे.

आता आरपारची लढाई

औसा येथील सभेत त्यांनी मिंधे सरकारवर जोरदार निशाणा साधला. या सरकारला जनाची नाही तर मनाची जरी लाज वाटत असेल तर हे सरकार मराठय़ांना आरक्षण देईल. परंतु, ते केवळ वेळकाढूपणा करत असल्याचे आता सिद्ध झालेले आहे. असा आरोप त्यांनी केला. आपण आपल्या 17 तारखेच्या बैठकीत आंदोलनाची दिशा ठरविणार आहोत असे त्यांनी सांगितले.

भुजबळांना त्यांची जागा दाखवून देऊ

औसा येथील सभेत त्यांनी भुजबळांना लक्ष्य केले. ते म्हणाले की, मराठा आणि ओबीसी समाजात भांडण लावण्याचे काम छगन भुजबळ करीत आहेत. त्यांचे आता वय झालेले आहे, त्यांचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे. अशा माणसावर मराठा व ओबीसींच्या नागरिकांनी विश्वास ठेवू नये. पूर्वीपासूनच ओबीसी व मराठा बांधव एकमेकांवर जिवापाड प्रेम करीत आलेला आहे आणि येणाऱया काळातही असेच प्रेम आपण कायम ठेवावे. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही आणि त्यासाठी आपली एकजूट महत्त्वाची आहे. आपणाला आरक्षण मिळाल्यावर याच छगन भुजबळांना त्यांची जागा दाखवून देऊ, असे आव्हानदेखील जरांगे यांनी दिले.

मराठे काय हे दाखवून देऊ

फडणवीस मराठय़ांच्या अंगावर मराठे घालत आहेत. आम्ही त्यांचा डाव उधळून लावू, असेही जरांगे म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा तरुणांवर दाखल करण्यात आलेल्या गुह्यांबाबत जी भूमिका घेतलीय, त्यात बदल करावा अन्यथा अधिवेशनानंतर मराठे काय आहेत हे त्यांना दाखवून देऊ, असा इशाराही मनोज जरांगे पाटलांनी दिला आहे.