मंत्रालय, विधान भवन सब वेचा खर्च वर्षभरात 2 कोटींवरून 99 कोटींवर, सुरक्षेच्या कारणास्तव झाला विलंब

712

भुयारी मेट्रोच्या विधान भवन स्थानकापासून मंत्रालय, विधान भवन आणि नवीन प्रशासकीय इमारतीदरम्यान सब वे बांधला जाणार आहे. मुंबई मेट्रो रेल महामंडळाने (एमएमआरसीएल) या सब वेसाठी दोन कोटी रुपये खर्च येईल असे वर्षभरापूर्वी सांगितले होते. परंतु सुरक्षेच्या कारणास्तव काम सुरूच न झाल्याने वर्षभरात हा खर्च 99 कोटींवर पोहोचला आहे.

हा प्रस्तावित सब वे 380 मीटर लांबीचा आहे. जानेवारी महिन्यातच एमएमआरसीएलने या सब वेची योजना जाहीर केली होती, परंतु सुरक्षेच्या कारणास्तव या सब वेला गृहखात्याने हिरवा कंदील दिला नव्हता अशी माहिती एमएमआरसीएलच्या अधिकार्‍यांनी दिली. सप्टेंबर महिन्यात गृहखात्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याने ऑक्टोबरमध्ये एमएमआरसीएलबरोबर या सब वेच्या बांधकामासाठी करार केला.  सब वेचा प्रस्ताव गृहखात्याकडे आला तेव्हा सुरक्षेच्या दृष्टीने त्यात विचार केला गेला नव्हता. त्यामुळे त्याला सुरुवातीला मंजुरी देता आली नाही. सुरक्षेची काळजी घेण्याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याने समाधानकारक अहवाल दिल्यानंतर सब वेच्या बांधकामासाठी मंजुरी दिली गेली अशी माहिती गृहखात्यातील सूत्रांनी दिली.

मंत्रालय, विधान भवन आणि नवीन प्रशासकीय इमारत या तिन्ही इमारतींमध्ये रोज सुमारे सात हजार कर्मचारी ये-जा करतात. त्यांची वाहनेही असतात. त्याचप्रमाणे आमदार, खासदारांच्या वाहनांचीही वर्दळ असते. सब वेमुळे हे ट्रफिक कमी होईल आणि तीनही इमारतींमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांसाठीही सोयीचे ठरेल.

आपली प्रतिक्रिया द्या