जेटमध्येही प्रेमविवाह झालेल्या अनेक जोडप्यांवर बेकारीची कुऱ्हाड

25
jet-airways

सामना ऑनलाईन । मुंबई

जेट एअरवेज बंद झाल्याने अनेक जोडप्यांचा संसारच उघडय़ावर पडण्याची भीती निर्माण झाली आहे. जेट एअरवेजमधल्या अनेक कर्मचाऱ्यांचा प्रेमविवाह झालेला आहे. पती आणि पत्नीची एकाचवेळी नोकरी गेल्यामुळे कुटुंबातील दुहेरी उत्पन्नाचा स्त्रोत बंद झाल्याचे वृत्त एका इंग्रजी सायंदैनिकाने दिले आहे. स्थिर, आरामदायी आयुष्य जगणाऱ्या जेटच्या कर्मचाऱ्यांना आता रोजचे खर्च भागवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

सलग तीन महिने वेतन न मिळाल्यामुळे घराचे हप्ते थकले असून मुलांच्या शाळांची फीदेखील भरता आलेली नाही असे एका महिला कर्मचाऱ्याने सांगितले. कंपनीच्या ग्राहक सेवा विभागात काम करणाऱ्या महिलेचा पती जेटमध्येच नोकरी करतो. नवरा केबिन क्रूचा सदस्य होता. दोघांची जेटमध्येच पहिल्यांदा ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात आणि नंतर दोघेही विवाहबद्ध झाले. पण आता एकाचवेळी दोघांची नोकरी गेली आहे. त्यामुळे नवीन विकत घेतलेल्या घराचे हप्ते फेडणे शक्य होत नाहीय असे एका महिला कर्मचाऱ्याने सांगितले.

 कर्मचाऱ्यांमध्ये 40 टक्के जोडपी

जेटमध्येच पती आणि पत्नी नोकरीला असणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या 40 टक्क्यांच्या घरात आहे. एअर इंडियाव्यतिरिक्त फक्त जेटच्या विमानांकडे परदेशात उड्डाणाचा परवाना होता. आता भविष्यात कंपनी कधी सुरू होणार याकडे सर्व कर्मचारी डोळे लावून बसले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या