
सोलापुरात ‘सीसीएच’ ऍपच्या माध्यमातून कोटय़वधी रुपयांची फसवणूक झाली असून, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात एका महिलेचाही समावेश आहे. आतापर्यंत 30 जणांनी तक्रार दिली आहे. तक्रारदारांची संख्या वाढत असून, फौजदार चावडी पोलीस स्टेशनला जत्रेचे स्वरूप आले आहे. आनंद येरमकोल्लू, जयंत येरमकोल्लू, स्मिता येरमकोल्लू अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
सोलापुरात ‘सीसीएच’ ऍपच्या माध्यमातून दामदुपटीचे आमिष दाखवीत हजारो जणांकडून गुंतवणूक करण्यात आली आहे. जुलैपासून शहरातील सामान्य नागरिकांसह अधिकारी, वकील, डॉक्टर, कारखानदारांनी मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून हे ऍप बंद झाले असून, नागरिक हवालदिल झाले आहेत. सोलापूर शहरात आनंद येरमकोल्लू, जयंत येरमकोल्लू, स्मिता येरमकोल्लू यांनी चौपाड परिसरात ऑफिस थाटून ऍपच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणावर कमिशनवर रक्कम जमा केली आहे. याशिवाय दत्त चौक, मंगळवेढा तालीम, मुरारजी पेठ, भवानी पेठ, सात रस्ता यांसह अनेक ठिकाणी एजंटांनी कार्यालय थाटून लोकांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले आहे.
गेल्या काही दिवसांपासून हे ऍप बंद झाले असून, त्यामुळे गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये राम अनिल जाधव (रा. दक्षिण कसबा) यांच्यासह 30 जणांनी आतापर्यंत तक्रार दिली आहे. येरमकोल्लू कुटुंबीयांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिघेही फरार झाले आहेत. फिर्यादी राम जाधव याने पाच लाख 68 हजार रुपये गुंतविले असून, सुरुवातीला त्याला काही प्रमाणात परतावा मिळाला आहे. यावर विश्वास ठेवून त्याच्या मित्र परिवारानेही यात गुंतवणूक केली आहे.
साखळी पद्धतीने फसवणूक
z शिंदे चौक, जुनी पोलीस लाइन, मुरारजी पेठ पूर्व भाग व जिह्यातील काही गुंतवणूकदारांनी एकमेकांच्या संपर्कात येत पैसे गुंतविले. त्यामुळे गुंतवणूकदारांची संख्या हजारो झाली आहे. ‘क्लाऊड मायनर’ हे ऍप अमेरिकन असल्याचे भासवून वाढत्या डॉलरच्या दराचा लाभ उठविण्याचे आमिष दाखविल्याने ऑनलाइन गुंतवणूक वाढल्याचे दिसून येते.
एका डॉलरसाठी 87 रुपयांची आकारणी
z डॉलरच्या किमतीनुसार किमान 10 ते 25 डॉलर्स व त्यापुढे मायनिंग मशीन नावाने गुंतवणूक केली जायची. एका डॉलरसाठी एजंट हे 87 रुपये दर आकारात होते आणि या रकमेवरही कमिशन घेण्याचा प्रकारही उघडकीस आला आहे. बार्शीतील फसवणुकीचा प्रकार ताजा असतानाच, सोलापुरातही पुढारी, डॉक्टर, वकील, पोलीस, कारखानदार, सराफ व्यापारी यांच्यासह सर्वसामान्यांनाही गंडविण्यात आले आहे.

































































