
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट रचल्याचा आरोप बीडच्या एका कार्यकर्त्याकडून करण्यात आला आहे. तशी तक्रार जालना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बीडमध्ये हा कट रचला गेल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलीस संशयितांची कसून चौकशी करत आहेत. याप्रकरणी मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रीया दिली असून मराठा बांधवांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे.
हे सत्य आहे कट शिजला गेला. हत्या घडवूण आणणं, घातपात करणं या सर्व गोष्टी आता उघडं होतीलच. जालना जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक स्वत: त्याच्यात लक्ष घालून आहेत. दुध का दुध पाणी का पाणी होईल. ते नाकारता येणार नाही, हे कट, षढयंत्र खूप मोठ्या व्यक्तीने शिजवलं आहे. हे सत्य आहे. मी याच्यावरती सविस्तर उद्या सकाळी 11 वाजला बोलणार आहे, असं मनोज जरांगे पाटील TV9 मराठीला बोलताना म्हणाले आहेत.
बाळा तुला सांगतो, तू लय चुकीच्या ठिकाणी हात घातलास, एवढं लक्षात ठेव. असले उष्टे, खरकाटे, बाटगे लय बघीतले आम्ही. तू लय चुकी केली बाळा, हे ध्यानात ठेव. मी करून घेणाऱ्याला मानतो. हे चुकीच पाऊल तू उचलायला नको होतं. आम्ही मराठे आहोत हे एवढं ध्यानात ठेवं. याच्यावर मी तर उद्या बोलणारच आहे, असं जरांगे पाटील म्हणाले आहेत.
मराठा बांधवांनी शांत राहावं
मी पाठपुराव्याला खंबीर आहे. मराठा बांधवांनी फक्त शांत रहा. यांचं टोळीचं, गँगवॉरच ते भेदून जर आपण माहिती काढू शकतो. तर आपण सुद्धा एवढे कच्चे नाहीत. कारण त्यांनी आतापर्यंत केलेल्या आणि पुढे होणाऱ्या घटना कधी कळू दिल्या नाहीत. व्हायच्या आगोदर जर माहिती होत असेल तर आपण सुद्धा कच्चे नाही. आपण सुद्धा लांब हात टाकू शकतो. हे त्या खरकाट्या उष्ट्या नेत्यांनी सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे. बेट्या तू चुकीच्या ठिकाणी खेटलास. फक्त माझ्या मराठा बांधवांनी शांत राहावं. माझ्या मराठा बांधवांनी शांत राहायला पाहिजे. रक्त जाळायचीच नाही तर रक्त सांडायची वेळ आली तरी सांडायला मी भेत नाही. असल्याला मरण्याला मी भेत नाही, असे जरांगे पाटील म्हणाले.
देवेंद्र फडणवीस खोलापर्यंत जाण्याचे आदेश देतात का ते बघू
देवेंद्र फडणवीस हमेशा कसल्याही कारणात आदेश देतात, कारवाई करतात, चौकशीला घेतात. बघू आम्ही याच्यात पण फडणवीस साहेब आदेश देतात का खोलापर्यंत जाण्याचे. त्याला चौकशीला घेण्याचे, किती गांभीर्याने दखल घेतात हेही लक्षात येईल. समाज बघतोय फडणवीस साहेब किती गांभिर्याने हा विषय घेतायत. हे गंभीर आहे, हे मात्र खर आहे. पण करणाऱ्यांच्या पाठपुराव्याला आम्ही खंबीर आहे. करणाऱ्यापेक्षा जो करून घेतोय त्याने त्याच्या आयुष्यातली खूप मोठी चूक केली आहे. त्याने चुकीच्या ठिकाणी हात घालायचा प्रयत्न केला आहे.
हा नेता लय चिल्लर आहे
सहा करोड मराठ्यांचा आशिर्वाद पाठिशी आहे. काही होत नाही मला. क्षत्रीय कुळात वाढलेली औलाद आहे आमची. शत्रुच्या छावन्या कशा उधळायच्या हे आम्हाला चांगल्या माहिती आहे. हा नेता लय चिल्लर आहे. मात्र, आता तू चुकीच्या ठिकाणी हात घातलास, हे लक्षात ठेव. उद्या सकाळी अकरा वाजता मी पुराव्यासहित सविस्तर सगळं सागणार आहे. एसपी साहेब सुद्धा याच्यात खोलात घुसणार आहेत. पोलीस बांधवांची बाजू कमकूवत होईल, अस एसपी साहेब करणार नाहीत याची खात्री. फडणवीस साहेब सुद्धा याची गांभिर्याने दखल घेतील. मराठा समाजाने थोडं संयम्माने शांततेने घ्या. मी खंबीर आहे.






























































