ओला दुष्काळ जाहीर करेपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा इशारा

अतिवृष्टीने मराठवाड्याचा शेतकरी खऱ्या अर्थाने उद्ध्वस्त झाला असून ओला दुष्काळ तातडीने जाहीर करा, शेतकऱ्यांना हेक्टरी 70 हजार रुपये अनुदान द्या, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा, अन्यथा जि.प., पं.स.च्या निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिला.

श्रीक्षेत्र नगद नारायणगड येथे दसरा मेळाव्यात मनोज जरांगे समाजाशी संवाद साधताना म्हणाले, मराठ्यांच्या पोरांनी आता शासन आणि प्रशासन झाले पाहिजे, डोकं लावून आणि हुशारीने वागा, दारिद्र्याचा गंज आता काढायचा आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं लेकरू गेलं पाहिजे. आरक्षणाच्या जिवावर सगळे बोगस लोक प्रशासनात जाऊन बसले आहेत. सत्ता असो किंवा नसो प्रशासनात आपले अधिकारी असले पाहिजेत.

जो आपल्या जातीचा अपमान करेल, अवमान करेल त्याला सोडायचं नाही, कडवट बना, सरसकट ओबीसीला दोष देऊ नका, जो आपल्या विरोधात बोलेल त्याला आणि त्याच्या बगलबच्च्यांना सोडू नका,

शेतीला नोकरीचा दर्जा द्या

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा, शेती वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना 1 लाख 30 हजार रुपयांची मदत करा, अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना हेक्टरी 70 हजार रुपयांचे अनुदान द्या, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव द्या, शेतीला नोकरीचा दर्जा द्या आणि प्रत्येक शेतकऱ्याला दहा हजार रुपये महिना द्या, पीक विम्यातल्या अटी, शर्थी बाजूला सारा, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसाला शासकीय नोकरी द्या, अशा मागण्या मनोज जरांगे यांनी सरकारकडे केल्या.