लडाखच्या 16,000 फूट उंचीवर विश्वविक्रमी मल्लखांब, मराठा लाइट इन्फंट्रीकडून विक्रमी कामगिरी

हिंदुस्थानी लष्कराच्या 27 राष्ट्रीय रायफल्स (मराठा लाइट इन्फंट्री) बटालियनने मार्शल आर्ट आणि मल्लखांबाच्या क्षेत्रात विश्वविक्रमाची नोंद केली. त्यांनी पारंपरिक हिंदुस्थानी युद्धकला आणि खेळाचे प्रतीक असलेल्या मल्लखांबात लडाखमधील 16,000 फूट उंचीवर 20 मिनिटांत 16 स्पर्धा पार करून एक अभूतपूर्व विक्रम नोंदवला.

सुभेदार कृष्णाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली 20 सैनिकांच्या चमूने ही कामगिरी करून हिंदुस्थानी सैन्याच्या शिस्त, ताकद, चिकाटी आणि सांस्कृतिक वारशाबाबत असलेल्या निष्ठsचे दर्शन घडवले. यामध्ये दाखवलेली ताकद, लवचिकता आणि संघभावना ही सैनिकी प्रशिक्षणाची फलश्रुती असून हा हिंदुस्थानी सैन्यासाठी गौरवाची बाब ठरला आहे. तसेच देशाच्या सांस्कृतिक परंपरेच्या संवर्धनातही आपले योगदान किती मोठे आहे, हे या विक्रमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.