वैद्यकीय प्रवेशातील आरक्षणाचा तिढा सुटला, मराठा आंदोलन अखेर मागे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशांत मराठा विद्यार्थ्यांना मिळालेला आरक्षणाचा तिढा सुटला. मात्र त्यानंतरही सीईटीच्या नोटिफिकेशनची वाट बघत आंदोलन सुरू ठेवणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांनी अखेर 15व्या दिवशी आपले आंदोलन मागे घेतले. या विद्यार्थ्यांना मिळालेले कॉलेज आणि अभ्यासक्रम कायम ठेवण्यासाठी सरकारने काढलेल्या वटहुकूमानंतर सीईटीनेही प्रवेश कायम करण्यास हिरवा कंदिल दाखविला. यामुळे आंदोलन मागे घेऊन विद्यार्थी आपापल्या कॉलेजांत रवाना झाले.

पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशातील आरक्षण कायम राहण्यासाठी मराठा विद्यार्थ्यांकडून सलग 15 दिवस आंदोलन करण्यात आले. सरकारने काढलेल्या वटहुकूमाबद्दल राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतानाच मराठा समाजाला पुन्हा आझाद मैदानात आंदोलन करावे लागू नये, अशी अपेक्षाही विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. त्याचप्रमाणे स्टेथस्कोप व पांढरा कोट घालून आम्ही रुग्णसेवेसाठी रुजू होत असल्याचेही विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले.

वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षणातून प्रवेश देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर राज्य सरकारने नवीन अध्यादेश काढून मराठा समाजातील वैद्यकीय पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे ऍडमिशन कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.

मराठा विद्यार्थ्यांसाठी कॅव्हेट दाखल
राज्य सरकारने काढलेल्या या अध्यादेशाच्या विरुद्ध कोणी न्यायालयात गेले तर निकाल मराठा विद्याथ्र्यांच्या विरुद्ध लागू नये यासाठी आर.आर. पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी समाजाच्या वतीने सर्वोच्च न्यायालय तसेच मुंबई उच्च न्यायालयात ‘कॅव्हेट’ दाखल केले आहे. सर्वाेच्च न्यायालयात अॅड. संदीप देशमुख तर मुंबई उच्च न्यायालयात अॅड. विजय किल्लेदार हे बाजू मांडणार आहेत.