
मराठा समाजाचा आता सरकारवर विश्वास नाही. त्यामुळे 20 जानेवारीला आम्ही कोणत्याही परिस्थितीत मुंबईकडे कूच करणार. पाच मुक्काम करत आमची आरक्षणवारी मुंबईत पोहोचणार आहे, अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली. आझाद मैदान तसेच शिवाजी पार्क ही दोन्ही मैदाने आम्ही मागितली असून 26 जानेवारीपासून तेथे उपोषण सुरू होईल, असेही ते म्हणाले.
मनोज जरांगे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुंबईत पोहचण्याचा सविस्तर मार्ग तसेच मुक्कामाच्या ठिकाणांची माहिती दिली. दररोज सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत आंदोलक पायी चालणार असून, त्यानंतर वाहनांनी मुक्कामाचे ठिकाण गाठण्यात येणार आहे. मुक्कामाच्या ठिकाणी आसपासच्या गावांतील लोकांनी खाण्यापिण्याची व्यवस्था करावी, असे आवाहन त्यांनी केले.
असा असेल प्रवास
20 जानेवारी – सकाळी 9 वाजता आंतरवाली सराटी येथून प्रस्थान. दुपारचे जेवण गेवराई तालुक्यातील कोळगाव येथे. शिरूर कासार तालुक्यातील मातोरी डोंगराजवळ मुक्काम.
21 जानेवारी – मातोरी डोंगर येथून प्रस्थान. दुपारचे जेवण पाथर्डी तालुक्यातील तणपुरीवाडी येथे. नगर जिह्यातील करंजी घाट, बाराबाभळी येथे मुक्काम.
22 जानेवारी – करंजी घाट येथून प्रस्थान. शिरूर तालुक्यातील सुपा येथे दुपारचे जेवण. रांजणगाव येथे मुक्काम.
23 जानेवारी – रांजणगाव येथून प्रस्थान. भीमा कोरगाव येथे दुपारचे जेवण तर खराडी बायपास, चंदननगर येथे मुक्काम.
24 जानेवारी – खराडी बायपासहून तळेगाव दाभाडेकडे प्रस्थान. तळेगाव येथे दुपारचे जेवण. लोणावळय़ाला मुक्काम.
25 जानेवारी – लोणावळय़ाहून पनवेलकडे कूच. पनवेलला दुपारी जेवण. वाशी, नवी मुंबईत मुक्काम.
26 जानेवारी – वाशीहून आझाद मैदानाकडे प्रस्थान. चेंबूरपर्यंत वाहनाने तर तेथून पुढे पायी चालत आझाद मैदान.
सरकारचा निरोप घेऊन आमदार बच्चू कडू पहाटेच आंतरवालीत
मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईकडे प्रस्थानाचा दिवस जवळ येत असल्याने सरकारदरबारी पुन्हा हालचाली सुरू झाल्या आहेत. पूर्वी शिष्टाईमंत्री गिरीश महाजन सरकारचा निरोप घेऊन येत असत. आता आमदार बच्चू कडू येत आहेत. सोमवारी पहाटेच आमदार कडू हे सरकारी खलिता घेऊन आंतरवालीत दाखल झाले. चर्चा करून मार्ग काढता येणे शक्य असल्याचे ते म्हणाले. त्यावर मनोज जरांगे यांनी 20 जानेवारीपर्यंत सरकारला काही करता आले तर बघा. नसता आमचे ठरलेलेच आहे, असे खडे बोल सुनावले.

























































