कुणाला मतदान करायचे आम्हाला समजते, मराठा आंदोलकांनी भाजप आमदारांना हाकलले

लातूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारासाठी आलेले आमदार संभाजी पाटील निलंगेकर आणि अभिमन्यू पवार यांना मराठा आंदोलकांनी गावाच्या वेशीवरून परत पाठवले. मत कुणाला द्यायचे हे आम्हाला समजते, असेही या आंदोलकांनी ठणकावून सांगितले. दोन्ही आमदार पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात आले होते.

भाजपचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारासाठी आमदार संभाजी पाटील निलंगेकर हे देवणी तालुक्यातील धनेगाव येथे आले होते. मात्र मराठा आंदोलकांनी गावाच्या वेशीवरच आमदारांचा ताफा अडवला. देवणी तालुक्यातीलच बोरोळ येथेही मराठा आंदोलकांनी आमदार संभाजी पाटील यांचा ताफा गावाच्या वेशीवरूनच परत पाठवला.

धाराशिव लोकसभा मतदारसंघातील अजितदादा गटाच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी कलमुगळी येथे आलेल्या आमदार अभिमन्यू पवार यांनाही मराठा आंदोलकांनी गावात येण्यापासून रोखले. कलमुगळी हे गाव आमदार पवार यांच्या औसा मतदारसंघातीलच आहे हे विशेष. भाजपचे माजी आमदार पाशा पटेल हे देखील याच गावाचे रहिवासी. आमदार अभिमन्यू पवार येताच मराठा आंदोलकांनी ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणा दिल्या. कुणाला मतदान करण्याचे हे आम्हाला चांगले समजते, तुम्ही सांगण्याची गरज नाही, असे म्हणत या आंदोलकांनी पवार यांना गावाबाहेरचा रस्ता दाखवला.