
सामाजिक व आर्थिक मागास प्रवर्ग (एसईबीसी) जाहीर करण्याचे केवळ राज्यांना अधिकार बहाल करून मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार नाही. मराठा आरक्षण द्यायचे असेल तर केंद्र सरकारने आरक्षणाची 50 टक्के मर्यादाही शिथिल करावी, अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाममंत्री व मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या मागणीवर स्पष्ट भूमिका घ्यावी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या शिष्टमंडळाने 8 जून रोजी नवी दिल्ली येथे पंतप्रधानांशी झालेल्या भेटीत आरक्षण मर्यादा शिथिल करण्यासाठी विनंती केली होती. न्यायालयात मराठा आरक्षणाच्या सुनावणीवेळी अनेक राज्यांनी ही मर्यादा शिथिल करण्यासाठी अनुकूलता व्यक्त केली होती. परंतु अद्याप केंद्र सरकारने याबाबत सुस्पष्ट भूमिका घेतलेली नाही. पेंद्राने स्पष्ट भूमिका घ्यावी, असे अशोक चव्हाण म्हणाले.
- न्यायालयाने 102व्या घटनादुरुस्तीनंतर एसईबीसी जाहीर करण्याचे अधिकार राज्यांना राहिलेले नसून ते अधिकार केंद्राकडे आहेत. तसेच मराठा आरक्षण कायद्याला 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडता येणार नाही, असे निर्णय दिले. हे दोन्ही अडथळे दूर करणे आवश्यक आहे.
- आरक्षणाची मर्यादा शिथिल करणे फक्त मराठा आरक्षणासाठी आवश्यक आहे, असे नाही. हा देशव्यापी प्रश्न आहे. आज बहुतांश राज्यांची आरक्षणे 50 टक्क्यांवर गेली आहेत. मराठा आरक्षण प्रकरणातील निकालामुळे आज त्यांचीही आरक्षणे धोक्यात आली आहेत.
- हा राजकारणाचा विषय नाही. सर्व राजकीय पक्ष आणि केंद्र व राज्य सरकारच्या समन्वयातूनच प्रश्न मार्गी लागू शकतो. आरक्षणाची 50 टक्के मर्यादा शिथिल करण्यासाठी भाजपने केंद्राकडे आग्रह धरावा.
मराठा आरक्षणाचा प्रवास सोपा झाला – विनोद पाटील
मराठा आरक्षणाचा प्रवास आता सोपा झाला आहे. केंद्राच्या या निर्णयाचे स्वागत आहे. राज्य सरकारने ठोस पावले उचलून मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्यायला हवे. आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी परिस्थिती अपवादात्मक नाही, असे न्यायालयाकडून सांगण्यात आले होते. मग अपवादात्मक परिस्थितीचे काय निकष आहेत, यावर चर्चा करावी आणि राज्य सरकारने ठोस पवले उचलून आरक्षण द्यावी, अशी मागणी मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केली आहे.
























































