मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र दिल्यास तेली समाज रस्त्यावर उतरेल, विदर्भ तेली समाज महासंघाचा इशारा

मराठा समाजास कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आणण्याचे निमित्त करून सरसकट मराठ्यांचे ओबीसीकरण करू नये. कुणबी समाज ओबीसीमध्ये असल्यामुळे तेली समाजासह अन्य समाजावर देखील हा अन्याय होणार आहे. या अन्यायाविरोधात तेली समाज रस्त्यावर उतरून तीव्र विरोध करेल असा इशारा विदर्भ तेली समाज महासंघाने सरकारला दिला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात आले आहे. यावेळी माजी आमदार देवराव भांडेकर, विदर्भ तेली महासंघ जिल्हा जिल्हाध्यक्ष प्रा. सूर्यकांत खनके, माजी महापौर संगीता अमृतकर, विदर्भ तेली महासंघ जिल्हा शहर अध्यक्ष गोपाल अमृतकर, विदर्भ तेली महासंघ जिल्हा महिला जिल्हाध्यक्ष मिनाक्षी गुजरकर, विदर्भ तेली महासंघ जिल्हा कार्याध्यक्ष गोविल मेहरकुरे यांची उपस्थिती होती.

कोणत्याही परिस्थितीत मराठा जातीचे ओबीसीकरण करू नये. त्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊ नये. हे दिल्यास फक्त कुणबी समाजावरच अन्याय होणार नसून संपूर्ण ओबीसी समाजावर हा अन्याय आहे. त्यामुळे हा अन्याय तेली समाज कदापि सहन करणार नाही. या विरोधात तेली समाज रस्त्यावर उतरेल, तसेच राज्यपातळीवर बिहार राज्याच्या धर्तीवर जातनिहाय जनगणना करून ओबीसींना न्याय द्यावा आणि मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा. राज्य सरकारने ओबीसींविरोधी अन्यायकारक निर्णय घेतल्यास संपूर्ण राज्यात ओबीसी रस्त्यावर उतरतील आणि ओबीसीविरोधी भूमिका घेणाऱ्या सर्वच पक्षांच्या विरोधात आगामी निवडणुकांत मतदान करील, असा इशारा विदर्भ तेली समाज महासंघाचे यांनी दिला आहे.