मंगळवेढ्यात मराठा आरक्षणासाठी चक्का जाम आंदोलन

मंगळवेढय़ात मराठा आरक्षणप्रश्नी सुरू असलेल्या आंदोलनात आज सोलापूर रस्त्यावर चक्का जाम आंदोलन करीत सरकारचा निषेध केला. याप्रसंगी संत दामाजी चौकात असलेल्या मंडपासमोर केलेल्या सरकारच्या प्रतीकात्मक दहन विधीचा तिसरा दिवस घालण्यात आला.

आज सकाळी मंगळवेढा-सोलापूर रस्त्यावरील जुन्या टोल नाक्याजवळ सकल मराठा समाजाच्या आंदोलकांनी चक्का जाम केला, यावेळी तासभर वाहतूक ठप्प झाली होती. त्यावेळी संत दामाजी चौकात सरकारच्या प्रतीकात्मक दहन विधीचा तिसरा दिवस घालण्यात आला.

प्रा. येताळा भगत म्हणाले, ‘सरकारची आरक्षण देण्याची मानसिकता दिसत नाही. केंद्रात व राज्यात एकाच विचाराचे सरकार असूनही अद्याप आरक्षणप्रश्नी तोडगा काढला नाही. मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष सरकार करीत असून, यापेक्षा तीव्र आंदोलन राज्यभर उभे करावे लागणार आहे. सरकारने मागून घेतलेल्या मुदतीमध्ये आरक्षणाच्या मुद्यावर चालढकल न करता महिन्याभरात तोडगा काढावा, अन्यथा महाराष्ट्र पेटून उठेल, असा इशारा दिला.

दरम्यान, विविध संघटनांचे पाठिंबा पत्र देण्यात आल़े यामध्ये मेडिकल असोसिएशन व कोळी समाजाने मराठा आरक्षण मागणीला पाठिंबा दिला. यावेळी सतीश दत्तू, राहुल सावजी, संभाजी घुले, शिवाजी वाकडे, विठ्ठल गायकवाड, आनंद मुढे, प्रकाश मुळीक, सुखदेव डोरले, युवराज घुले, मारुती वाकडे, राहुल घुले, अनिल मुद्गल, विजय हजारे, दत्तात्रय भोसले, स्वप्नील फुगारे आदी उपस्थित होते.