
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन समाजांत तेढ निर्माण होईल, असे बोलत आहेत, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी हिंगोली येथील पत्रपरिषदेत केली. त्यांनी विचारपूर्वक बोलावे. सत्ताधाऱयांनी सर्व समाजाला न्याय दिला पाहिजे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला कसा न्याय देता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.
मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अनेक वर्षांपासून ही मागणी करण्यात येत आहे. परंतु, या सरकारची मराठा समाजाला आरक्षण देण्याची इच्छाशक्ती नसल्याची टीकाही त्यांनी केली. मनोज जरांगे पाटील शनिवारी हिंगोलीतील मराठा समाजबांधवांनी सुरू केलेल्या साखळी उपोषणाला भेट देण्यासाठी तसेच निर्धार मेळाव्यासाठी आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. जिंतूर येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयातील जाहीर सभेत ते म्हणाले की, पूर्वीपासून मराठा आणि कुणबी एकच आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठा समाजातील बांधवांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही.
१४ रोजी आंतरवली सराटीत सभा
मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देण्यासाठी मागणी पूर्ण होईपर्यंत आपण थांबणार नाही, असे मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले. सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित सभेत ते बोलत होते. 14 ऑक्टोबर रोजी आंतरवाली सराटी येथे कुंभकर्णी झोपेतील सरकारला जागे करण्यासाठी व मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या विराट सभेचे आयोजन केले आहे. महाराष्ट्रातील मराठा बांधव, भगिनी व तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले. यावेळी जरांगे पाटील यांचे हदगाव तालुक्यातील तळणी, उमरी (भा.), तळणी, निवघा बाजार, धानोरा (रु.), रुई, मानवाडी फाटा, हडसणी, हरडफ व अन्य ठिकाणी जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी करत जल्लोशात स्वागत करण्यात आले.
सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळल्याशिवाय माघार नाही
येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयातील जाहीर सभेत ते म्हणाले की, पूर्वीपासून मराठा आणि कुणबी एकच आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठा समाजातील बांधवांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही. सरकारने अनेक आश्वासने देऊन नवनवीन शासन आदेश काढून दिशाभूल करण्याचे काम केले. शासनाने आश्वासन देऊन एक महिना पूर्ण होत असल्याने या दिवशी सरकारला एक इशारा म्हणून १४ ऑक्टोबर रोजी आंतरवाली सराटी येथे आयोजित करण्यात आलेल्या मराठा आरक्षण मेळाव्याला मोठ्या संख्येने समाजबांधवांनी उपस्थित रहावे, तसेच मराठा आरक्षण आपल्या हक्काचे आहे. त्यामुळे आत्महत्या करू नका, कायदा हातात घेऊ नका, असे आवाहन त्यांनी युवकांना केले.




























































