
मराठा समाजातील तरुण आरक्षणाच्या मागणीसाठी अधिकच आक्रमक होताना दिसत असून पंढरपूर तालुक्यातील 30 हून अधिक ग्रामपंचायतींनी सर्वपक्षीय नेते, लोकप्रतिनिधी आणि पुढाऱ्यांना गाव बंदी करण्याचा ठराव केला आहे. “चुलीत गेले पक्ष, मराठा आरक्षण एकच आमचे लक्ष”, “जो समाजाला मानत नाही, त्याला समाज मानत नाही”, अशा आशयाचे डिजिटल बोर्ड गावागावात झळकत आहेत.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा समाजाने आता सामोपचाराची भूमिका सोडून आक्रमक भूमिका घेतली असून सर्वपक्षीय आमदार , खासदार तसेच अन्य नेते मंडळी हे ठोस भूमिका घेत नसल्यामुळे मराठा समाजातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याचाच एक भाग म्हणून पंढरपूर तालुक्यातील गादेगाव, वाखरी,शेळवे,आंबे,चळे,तुंगत, उपरी, खेडभोसे, तारापूर, तावशी, खेडभोसे आदी गावामध्ये सर्वपक्षीय राजकीय पुढाऱ्यांना गावात प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
पंढरपूर तालुक्यात 110 गावे आहेत त्यापैकी 30 गावांनी आज अखेर गावबंदीचे ठराव केले आहेत. मराठा युवकांनी गावागावात बैठका घेवून अत्यंत आक्रमक भूमिका मांडत सत्ताधारी तसेच विरोधी सर्वपक्षीय नेत्यांना घारेवर धरले आहे. या बैठकीत ‘जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत गावात राजकीय नेत्याना गावबंदीचा इशारा देण्यात आला. प्रवेश बंदी असतानाही एखाद्या राजकीय नेत्याने गावात प्रवेश केल्यास, त्यानंतर होणाऱ्या मानापमानास तो नेता स्वतः जबाबदार असेल, असा सूचक इशाराही यावेळी देण्यात आला.


























































