मराठा आंदोलन, ९ ऑगस्टला प्रचंड उद्रेकाची भीती

7

सामना प्रतिनिधी । मुंबई

मराठा आरक्षणासाठी राज्यभरात ९ ऑगस्टपासून पुन्हा नव्याने आंदोलन सुरू होणार आहे. या आंदोलनावेळी हिंसाचार होऊ शकतो अशी माहिती गुप्तवार्ता विभागाला मिळाली आहे. दिल्लीहून केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या १६ तुकड्यांची कुमक मागवली असल्याचे राज्य गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुनील पोरवाल यांनी सांगितले. पोलीस दलाकडे राखीव राज्य पोलिसांच्या तुकड्या आहेत, पण राज्यभरात एकाच वेळी, एकाच दिवशी आंदोलन झाले तर त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी, हिंसाचाराच्या घटना रोखण्यासाठी या तुकडय़ा अपुऱया असल्यामुळे आम्ही केंद्राकडे पत्र लिहून अतिरिक्त तुकडय़ांची मागणी केली आहे, असे पोरवाल यांनी सांगितले. एका तुकडीत ८० ते १५० सशस्त्र जवान आणि महिला असतात.

मराठवाडय़ात तरुणीने विष घेतले, तरुणाचा गळफास
मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची धग कायम असतानाच धाराशीव जिल्हय़ातील तृष्णा तानाजी माने या तरुणीने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली आहे, तर बी.एस्सी.पर्यंत शिकूनही नोकरी मिळत नसल्याने निराश झालेल्या उमेश आसाराम यंडाईत या संभाजीनगरातील तरुणाने गळफास घेतला आहे.

मूळ कळंब तालुक्यातील देवळालीची तृष्णा माने ही तरुणी धाराशीवच्या व्ही. जे. कॉलेजमध्ये बी. कॉम.च्या द्वितीय वर्षाला होती. मराठा समाजाच्या मूकमोर्चात ती सहभागी होती. तृष्णाच्या घरी २० एकर शेती असून वडिलांवर ढोकी येथील स्टेट बँकेचे ३ लाखांचे कर्ज १२ लाखांवर पोहोचले होते. यातच तृष्णाने २९ जुलै रोजी विष घेतले. पदवी घेऊनही नोकरी मिळत नसल्यामुळे संभाजीनगरच्या चिकलठाणा भागातील उमेश आसाराम यंडाईत (२२) याने आज दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यापाठोपाठ संतप्त झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त रास्ता रोको केला. आत्महत्या करण्यापूर्वी उमेशने चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यात शिक्षण अपूर्ण राहिले, आरक्षण नसल्यामुळे नोकरीही मिळत नाही म्हणून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. त्याच्या पश्चात आईवडील, भाऊ व बहीण आहे.

अमरावतीत तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न
मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱयांमध्ये आरक्षण द्या या मागणीसाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज संजय महादेव कदम (४०, रा. वडाळी) या इसमाने आत्मदहनाचा प्रयत्न केला, मात्र सुरक्षा रक्षकाच्या प्रयत्नामुळे ते बचावले. १६ टक्के मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे अशी घोषणाबाजी करत संजय कदम यांनी अंगावर रॉकेल ओतले, मात्र सुरक्षा रक्षक प्रमोद माहुरकर यांनी त्यांना वेळीच रोखल्याने अनर्थ टळला.

आपली प्रतिक्रिया द्या