मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी केंद्राने हस्तक्षेप करावा, शिवसेनेची लोकसभेत मागणी

मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठा समाजामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. हे हक्काचे आरक्षण मिळावे यासाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी संसदेत केली आहे.

102 व्या घटनादुरुस्ती नंतर राज्यांना एखाद्या विशिष्ट समाजाला मागास दर्जा देऊन त्यांच्यासाठी आरक्षण देण्याचा अधिकार’ राज्याला आहे की केंद्राला हे ठरवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग केले आहे. मात्र यावरून जो पेच निर्माण झाला आहे तो तातडीने सोडवून मराठा समाजाला न्याय द्यावा अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी शून्य प्रहारात बोलताना केली.

देशातील चार कोटी मराठा समाजाचा हा प्रश्न असून सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठवावी यासाठी ठोस प्रयत्न करण्याची गरज आहे. मात्र त्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला मदत करावी अशी आग्रहाची मागणी राजन विचारे यांनी केली. मराठा आरक्षण कायद्याला घटनेच्या 9 व्या अनुसूचित घालावे अशी सूचनाही त्यांनी केली असून हा ज्वलंत प्रश्न सोडविण्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घ्यावा अशी आग्रही मागणी विचारे यांनी केली.

आपली प्रतिक्रिया द्या