Maratha Reservation – मुंबईत मराठा आंदोलकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

अहमदपूर तालुक्यातील टाकळगाव येथील मराठा आंदोलक विजय चंद्रकांत घोगरे (35) यांचा मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ते मुंबईतील आझाद मैदानावर गेले होते. शनिवारी दुपारी अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने ही दुर्दैवी घटना घडली.

​मिळालेल्या माहितीनुसार, विजय घोगरे हे टाकळगावमधील 60 आंदोलकांसोबत स्वतःच्या गाडीने मुंबईत आले होते. आंदोलनादरम्यान, शनिवारी (30 ऑगस्ट 2025) दुपारी 3 वाजता त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने जे. टी. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथील प्राथमिक उपचारानंतर त्यांना जे. जे. हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घोगरे यांच्या निधनाची बातमी टाकळगावमध्ये पोहोचल्यावर गावात शोककळा पसरली. मराठा आरक्षणासाठी एका तरुणाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. विजय यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.