
सामना प्रतिनिधी । तुळजापुर
सकल मराठा समाज क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा आरक्षण मागणीच्या दुसऱ्या पर्वाला उद्या शुक्रवार पासुन भवानीमाते समोर जागरण गोंधळाने सुरूवात होत आहे. सकाळी ११ वाजता विशाल जनसमुदायाच्या साक्षीने देवीचे वंशपरंपरागत गोंधळी राजाभाऊ गायकवाड व त्यांचे सहकारी मराठा समाजाच्या विविध मागण्या जागरण गोंधळातुन देवीसमोर सादर करून देवीला साकडे घालणार आहेत.
राज्यातील विविध जिल्ह्यातुन मराठा आरक्षणासाठी पाठपुरावा करणारे नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत. राज्यसमन्वयक आबासाहेब पाटील यांनी तुळजापुरात सात दिवस मुक्काम ठोकुन जागरण गोंधळ कार्यक्रमाची तयारी केली आहे. याप्रसंगी चळवळीचे नेते राजेंद्र केरे – पाटील (संभाजीनगर), महंत तुकोजी महाराज, महंत मावजीनाथ महाराज, महंत सोमवारगिरी महाराज, तुळजाभवानी पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जन साळुंके, तुळजाभवानी भोपे मंडळाचे अमरराजे परमेश्वर, शिवबाराजे प्रतिष्ठान अध्यक्ष अर्जुन साळुंके, छावाचे विभागीय अध्यक्ष जीवनराजे इंगळे, शिवमुद्राचे अध्यक्ष किशोर पवार हे मान्यवर जागरण गोंधळास उपस्थित राहणार आहेत.
देवीच्या दरबारात मराठा समाजाच्या मागण्यांचा हा गोंधळ राज्य सरकारला जागे करण्यासाठी आहे. फडणवीस सरकार हे मराठा आरक्षणाच्या मागणीवर वेळकाढूपणा करीत आहे. ५८ विराट मुक मोर्चे काढल्यानंतरही सरकार फसव्या घोषणाबाजीचा खेळ थांबलेला नाही मराठा समाज आरक्षणाची मागणी सातत्याने करीत असताना सरकार सतत चालढकल करीत आहे, शैक्षणिक क्षेत्रासाठी उपयुक्त आरक्षण मिळाले पाहिजे, शासनाचे परिपत्रकांचा खेळखंडोबा सुधारला पाहिजे यासह इतर मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी दुसऱ्या पर्वाचे आंदोलन सुरू होत आहे, अशी माहिती स्थानिक समन्वयक किशोर पवार यांनी दिली.
सुमारे १५ हजार समाजबांधव गोंधळ कार्यक्रमासाठी येत असुन मुक्कामाला येणाऱ्यां कार्यकर्त्यांची पाच भक्त निवासात राहण्याची सोय केली आहे. शांततेत सदर आंदोलन पार पाडण्यासाठी सर्वांना सुचना केल्या असुन देवीच्या दरबारात सरकारच्या नाकर्तेपणावर बोट ठेवणारा हा कार्यक्रम मराठा आरक्षण आंदोलन राज्यभर दुसरे पर्व म्हणुन केले जाणार आहे.
चोख नियोजन
गर्दीचा अंदाज घेवुन चार पार्कीग मध्ये वाहनांची पार्कींग केली जात आहे. स्वच्छतागृहांचीउभारणी दोन ठिकाणी असेल, सात ठिकाणी पाणपोई उभारणी केली आहे. शिवाजी महाराज पुतळ्यास पुजा करून कार्यक्रमाला सुरूवात होणार आहे. तेथुन रॅलीद्वारे तुळजाभवानी महाद्वार येथे आल्यानंतर देवीचे परंपरागत गोंधळी राजाभाऊ गायकवाड व सहकारी मराठा समाजाच्या मागण्यांचे साकडे येथे सादर होणाऱ्या जागरण गोंधळातुन घालणार आहे. सुमारे दोन तास हा जागरण गोंधळाचा कार्यक्रम चालणार आहे.
































































