आधी मराठा आरक्षण मार्गी लावा; मराठा तरुण महादेव जानकरांना भिडला

लोकसभा निवडणूक लढवणाऱया उमेदवारांना राज्यभरात ठिकठिकाणी मराठा समाजाच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. परभणीत महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांना त्याचा आज अनुभव आला. प्रचारासाठी आलेले जानकर यांना एक मराठा तरुण अक्षरशः भिडला. परभणीतून निवडून आणतो, आधी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा, असा आग्रह धरत त्याने कॅमेऱयासमोरच जानकरांवर प्रश्नांचा इतका भडिमार केला की जानकरांना घाम फुटला.

जानकर यांना महायुतीने अजित पवार गटाच्या कोटय़ातून परभणी मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. प्रचार करताना एका मराठा तरुणाने ‘एक मराठा लाख मराठा’ घोषणा देत जानकरांना अडवले. आधी मराठा आरक्षणावर तोडगा काढा असा आग्रह त्याने धरताच जानकरांचीही बोलती बंद झाली. मराठा तरुणाचा तो आक्रमकपणा पाहून जानकर यांनीही बाळा…बाळा… म्हणत त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या तरुणाने कॅमेऱयासमोरच जानकरांना एकापाठोपाठ एक प्रश्न विचारायला सुरुवात केली. मराठा समाजाच्या या रोषाला तोंड कसे द्यायचे या विचाराने मात्र जानकर यांच्या चेहऱयावर घाम फुटल्याचे अनेकांनी पाहिले.