मराठा समाजाचा दिवाळीत नवा पक्ष

43

सामना ऑनलाईन । कोल्हापूर

सकल मराठा समाज राजकीय पक्षाची अधिकृत घोषणा येत्या दिवाळीच्या काळात करण्यात येणार आहे. यावेळी कोणत्याही राजकीय पक्षाच्या दावणीला हा पक्ष बांधला जाणार नसल्याची शपथच रायरेश्वर मंदिरात घेण्यात येणार असून, या पक्षाच्या वतीने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकही लढविण्यात येणार असल्याचा निर्णय आज दुपारी शिवाजी पेठ येथील छत्रपती शिवाजी मंदिरमधील बैठकीत घेण्यात आला.

सरकारने शब्द दिल्याप्रमाणे 14 नोव्हेंबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही, तर दुसऱ्या दिवसापासून संपूर्ण राज्यभर परत ठोक मोर्चा आंदोलन करण्याचा इशाराही या बैठकीत देण्यात आला. गेल्या दोन दिवसांपूर्वीच समन्वयक व उद्योजक सुरेश पाटील यांनी सकल मराठा समाज राजकीय पक्ष स्थापन करण्यात येणार असल्याचे पत्रकार परिषदेतून जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर आज या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी महापौर सई खराडे, निवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक अजित पाटील, बाळ घाटगे, प्रकाश सरनाईक, राजू सावंत, राणी पाटील, रावसाहेब इंगवले आदी उपस्थित होते.

तर समाज विभागेल – संभाजी दहातोंडे

श्रीरामपूर-  हा निर्णय चुकीचा आहे. मराठा क्रांती मोर्चे हे सर्व पक्षांतील नेते व कार्यकर्त्यांच्या सहभागाने निघाले आहेत. सर्व समाज हा मतभेद, पक्षभेद विसरून सामील झाला होता. मात्र, आता पक्ष काढला, तर समाज वेगळ्या दिशेने जाईल. पक्ष, गट, तट यात विभागेल. पक्ष काढून प्रश्न सुटणार नाही, उलट गुंता वाढेल, असे प्रतिपादन मराठा महासंघाचे राज्य संपर्कप्रमुख संभाजी दहातोंडे यांनी केले.

आपली प्रतिक्रिया द्या