
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा आणि यासाठी पंतप्रधान मोदी यांनी स्तःव लक्ष घालून तातडीने आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश संबंधितांना द्यावे, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका पत्राद्वारे केली आहे.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबत महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या तज्ञ समितीने दिलेल्या अहवालाच्या आधारे केंद्र सरकारकडे 16 नोव्हेंबर 2013 साली प्रस्ताव सादर करण्यात आला. अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी आवश्यक निकष मराठी भाषा पूर्ण करते. अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबत अनेकदा पाठपुरावा करूनही हे प्रकरण केंद्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाकडे प्रलंबित असल्याकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींचे लक्ष वेधले आहे.
पंतप्रधानांनी स्वतः लक्ष घालावे
केंद्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य किभागाने हे प्रकरण साहित्य अकादमीच्या भाषा समितीकडे विचारार्थ असल्याचे कळविले आहे. बऱ्याच कालावधीपासून हे प्रकरण प्रलंबित असल्याने पंतप्रधानांनी स्वतः लक्ष घालून मराठीला तातडीने अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रात नमूद केले आहे.

























































