रंगभूमीवर विशेष प्रेम

>>गणेश आचवल

सन टीव्ही मराठीवर ‘कन्यादान’ ही मालिका गेली दोन वर्षे सुरू आहे. त्यामध्ये वर्षा ही नकारात्मक भूमिका करणारी अभिनेत्री म्हणजे आकांक्षा गाडे…एक प्रॉमिसिंग चेहरा.

आकांक्षाचे शालेय शिक्षण पार्ले टिळक शाळेत झाले. लहानपणी बालनाटय़ शिबिरांमध्ये तिचा सहभाग होता आणि ती भरतनाटय़मदेखील शिकत होती. साठये कॉलेजमध्ये आल्यानंतर तिला ‘मृगजळ’ एकांकिका स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली आणि पहिल्याच एकांकिकेसाठी अभिनयाचे प्रशस्तीपत्र मिळाल्याने तिला या क्षेत्राची आवड निर्माण झाली. मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात मराठी-हिंदी पथनाटय़, तसेच लोकसंगीतावर आधारित वाद्यवृंद, मायमिंग अशा अनेक स्पर्धांतून तिला पारितोषिके मिळाली आणि मग नीलेश सावे सरांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या मुंबई विद्यापीठाची एक टीम तयार झाली. त्यात आकांक्षाचा सहभाग होता. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये तिने यश मिळवले. त्याच वेळी ‘मराठी पाऊल पडते पुढे’ नावाचा एक रिऑलिटी शो ‘झी मराठी’वर येत होता. सावे सरांनी या विद्यार्थ्यांच्या गटाला त्यात भाग घ्यायला सांगितला आणि त्या कार्यक्रमासाठी मकरंद देशपांडे परीक्षक होते. तो कार्यक्रम आकांक्षाच्या आयुष्यातील टार्ंनग पॉइंट ठरला. मकरंद देशपांडे यांच्या ‘व्हॉट अ लोटा’ तसेच ‘कृष्णा किडिंग’, ‘एपिक गडबड’, ‘पिताजी प्लीज’, ‘शेक्सपिअरचा म्हातारा’ अशा अनेक हिंदी आणि मराठी प्रायोगिक नाटकांत तिने भूमिका केल्या. पृथ्वी थिएटरच्या अनेक नाटकांत तिच्या भूमिका होत्या.

आकांक्षा म्हणते, ‘‘मला नाटकाची प्रोसेस अनुभवण्यात खूप आनंद मिळतो. तिथे प्रत्येक प्रयोग हा वेगळा अनुभव देत असतो. तसेच मकरंद देशपांडे यांच्याकडून दरवेळी काहीतरी नवीन शिकायला मिळत असते.’’

आकांक्षाने गुरू डॉ. गौरी पोंक्षे यांच्या मार्गदर्शनाखाली भरतनाटय़म प्रशिक्षण पूर्ण केले. आकांक्षाचे अरंगेत्रमदेखील पूर्ण झाले आहे. ‘असं सासर सुरेख बाई’, ‘शुभमंगल ऑनलाइन’, ‘लाडाची मी लेक ग’ अशा काही मालिकांदेखील तिच्या भूमिका होत्या. ‘डिअर जिंदगी’ या हिंदी चित्रपटातून तिचे बॉलीवूडमध्ये पदार्पण झाले. ‘स्कॅम 92’ या वेब सीरिजमध्येही ती होती. ‘नवा गडी नवं राज्य’ आणि ‘कन्यादान’ या दोन्ही मालिकांत तिच्या नकारात्मक भूमिका आहेत. आकांक्षा म्हणते, ‘‘नकारात्मक भूमिका करताना खरेच खूप वेगळे वाटत असते. कारण आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या, स्वभावाच्या भिन्न स्वभावाची आपण भूमिका करत असतो.’’

‘सर प्रेमाचं काय करायचं’ या नाटकातील तिची प्रमुख भूमिकाही आपल्या लक्षात राहते. ‘मधुरव’सारख्या प्रयोगातून गायन, अभिनय आणि नृत्य अशा सर्व कला तिला साकारायला मिळतात. कलेच्या प्रांतात रंगभूमी हे माध्यम तिला तुलनेने जास्त आवडते, पण प्रत्येक माध्यमाचा आनंद वेगळा असल्याचेदेखील ती सांगते.