‘मोरूची मावशी’ फेम ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन

ज्येष्ठ मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 65 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती मिळत आहे.

प्रदीप पटवर्धन हे मुंबईतील गिरगाव येथे रहात होते. कॉलेज जीवनापासूनच त्यांनी अनेक एकांकिकांमध्ये काम केले होते. त्यानंतर ते व्यावसायिक नाटकाकडे वळले. ‘मोरूची मावशी’ या अतिशय गाजलेल्या नाटकामध्ये त्यांनी भूमिका केली होती. या नाटकाचे त्यांनी तब्बल दीड हजारांहून अधिक प्रयोग केले. या नाटकामुळे त्यांना विशेष ओळख मिळाली. यासह अनेक चित्रपट आणि मालिकांमध्येही त्यांचा सहभाग होता.

प्रदीप पटवर्धन यांनी नाटकांसह अनेक चित्रपट आणि मालिकांमध्येही काम केले. विनोदी अभिनेते अशी त्यांची ओळख होती. ‘एक फुल्ल चार हाफ’, ‘डान्स पार्टी’, ‘गोळा बेरीज’, ‘बॉम्बे वेल्वेट’, ‘चष्मे बहाद्दर’, ‘लावू का लाथ’, ‘भुताळलेला’, ‘नवरा माझा भवरा’, ‘डोम’, ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’, ‘जमलं हो जमलं’, ‘एक शोध’, ‘परीस’ या चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका केली. तसेच ‘होल्डिंग बॅक’ (2015), ‘मेनका उर्वशी’ (2019) आणि ‘थँक यू विठ्ठला’ (2007), ‘एक दोन तीन चार’ (2016) आणि ‘पोलीस लाईन एक पूर्ण सत्य’ (2016) यासारख्या चित्रपटांची निर्मितीही त्यांनी केली.

दरम्यान, प्रदीप पटवर्धन यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी ट्विट करत प्रदीप पटवर्धन यांना श्रद्धांजली वाहिली.