रंगकर्मींचा एल्गार, विविध मागण्यांसाठी राज्यभरात जागर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या संकटामुळे मनोरंजन विश्व गेले दीड वर्ष ठप्प आहे. मानसिक तसेच आर्थिक विवंचनेत सापडलेल्या कलावंतांनी आपला आवाज सरकारपर्यंत पोचवण्यासाठी सोमवारी क्रांतिदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रभर राज्यव्यापी आंदोलन केले.अभिनेते विजय पाटकर यांच्या नेतृत्वाखाली दादर येथील चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या स्मारकाशेजारी आंदोलन करण्यात आले.

रंगकर्मी आंदोलनात रंगकर्मींनी आपल्या कलांचे सादरीकरण यावेळी केले. ‘जागर रंगकर्मींचा’ हा कार्यक्रम सादर करून कलाकारांनी आपल्या मागण्या यावेळी मांडल्या. आंदोलन करणाऱ्या विजय पाटकर, विजय राणे, मेघा घाडगे, संचित यादव, शीतल माने या रंगकर्मींना यावेळी भोईवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले. सरकारकडून ठोस आश्वासन मिळत नाही तसेच मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत भोईवाडा पोलीस स्टेशनबाहेरच ‘ठिय्या आंदोलन’ करण्याचा पवित्रा सर्व रंगकर्मीनी घेतला. चित्रपट, मालिका, नाटक क्षेत्रातील कलाकार तंत्रज्ञांसोबतच तमाशा, भजन, कीर्तन, भारुड, गोंधळ, जागरण, पोवाडा, लावणी, दशावतार, डोंबारी, लेझीम, वासुदेव, पोतराज, नंदीबैल, पिंगुळा, भराड इतर लोककला सादर करणाऱ्या तसेच वाद्यवृंद क्षेत्रातील सुमारे एक हजारहून अधिक कलाकार या आंदोलनात सहभागी झाले.

सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी आमच्या शिष्टमंडळाला उद्या भेटायला बोलावले आहे. त्यामुळे आजच्यापुरते आंदोलन स्थगित गेले. मात्र आंदोलन थांबलेले नाही. जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर आणखी जोमाने वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन करू, असे विजय राणे यांनी सांगितले.