14 ते 28 जानेवारीला मराठी भाषा संवर्धन पंधरवडा, मराठी भाषेची महती उलगडणारे कार्यक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात 14 ते 28 जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला जाणार आहे.  यानिमित्ताने राज्य सरकारच्या वतीने ग्रंथप्रदर्शन, अभिवाचन स्पर्धा आणि मराठी प्रश्नमंजुषा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

मराठी भाषा संवर्धन पंधरवडय़ाचे उद्घाटन आज दि. 14 जानेवारी 2021 रोजी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार आहे. मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात सकाळी 11 वाजता दीपप्रज्वलनाने पंधरवडा कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे.

यावेळी मराठी भाषेसाठी वेगवेगळ्या प्रकारे योगदान देणाऱया मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांना गौरविण्यात येईल. या पंधरवडय़ानिमित्त मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्पृती  मंडळ , पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, उच्च व तंत्र शिक्षण (ग्रंथालय) विभाग आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या माध्यमातून मराठी भाषेची महती सांगणाऱया विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, केंद्र शासनाच्या अखत्यारीतील सर्व संस्था, विद्यापीठे, महाविद्यालये इत्यादी सर्व संस्थांमधून मराठी भाषा पंधरवडा साजरा केला जाणार आहे.

‘निलांबरी’ बसमध्ये फिरते प्रदर्शन

भाषा संचालनालयाचा परिभाषा कोश, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्पृती मंडळ आणि शासकीय मुद्रणालयाद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन आगळ्यावेगळ्या स्वरुपात असणार आहे.

बेस्टच्या ’निलांबरी’ बसमध्ये हे फिरते प्रदर्शन असणार आहे. मंत्रालय आवारातून निघणारी ही बस पुढील दोन दिवस पर्ह्ट, नरिमन पॉईंट या भागात असेल. या प्रदर्शनातून साहित्य रसिकांना सवलतीच्या दरात पुस्तके विकत घेता येतील.

अभिवाचन स्पर्धा

मराठी भाषा संवर्धन पंधरवडय़ाच्या निमित्ताने अभिवाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात दुपारी 1 ते 3 या वेळेत ही स्पर्धा होणार आहे.