
स्वयंचलित बंद दरवाजाच्या नॉन एसी लोकलवर मराठी भाषेचा प्राधान्याने ठळकपणे उल्लेख केला जाणार आहे. शिवसेनेच्या दणक्यानंतर मध्य रेल्वेने नव्या लोकलच्या अंतर्गत व बाह्य भागात मराठीत सूचना लिहिण्याच्या कार्यवाहीला गती दिली आहे. येत्या चार दिवसांतच मराठीत सूचना लिहिण्याबरोबर स्थानिक भाषेच्या शब्दांतील सर्व चुकांची दुरुस्ती करणार असल्याचे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी गुरुवारी सांगितले.
दहा दिवसांपूर्वी देशातील पहिली स्वयंचलित बंद दरवाजाची लोकल कुर्ला कारशेडमध्ये आली. मुंबईत धावणाऱया या लोकलमध्ये मराठीचा प्राधान्याने उल्लेख करणे गरजेचे होते. मात्र रेल्वे प्रशासनाने मराठीला डावलून हिंदी व इंग्रजी भाषेत सूचना लिहिल्या. दरवाजाबाहेर मराठी शब्दांचा किरकोळ वापर केला. त्यातही अनेक चुका केल्या. त्याबाबत ‘दै. ‘सामना’मध्ये वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱयांना जाब विचारला.
त्यानंतर रेल्वे प्रशासनाने नव्या लोकलमध्ये मराठीत सूचना तसेच सर्व चुकांची दुरुस्ती करण्याच्या कार्यवाहीला गती दिली आहे. पुढील चार दिवसांतच बंद दरवाजाच्या लोकलच्या अंतर्गत भागात हिंदी, इंग्रजीसोबत मराठी भाषेतील सूचना फलक लावले जातील. तसेच मराठी शब्दांतील चुका दुरुस्त केल्या जातील. गाडी प्रवासी सेवेत धावण्यापूर्वी आवश्यक तेथे सुधारणा करणार आहोत, असे रेल्वेच्या संबंधित विभागातील अधिकाऱयांनी सांगितले.
नव्या लोकलची प्रवासी सेवा महिनाभरानंतर
लोकलच्या गर्दीमुळे सुरू असलेले अपघाती मृत्यूचे सत्र थांबविण्यासाठी स्वयंचलित बंद दरवाजाची लोकल मुंबईत आणली आहे. या लोकलच्या तीन टप्प्यांत वेगवेगळय़ा चाचण्या केल्या जातील, त्यानंतर ‘रिसर्च डिझाईन्स अॅण्ड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन’कडून (आरडीएसओ) फिटनेस प्रमाणपत्र मिळवले जाईल. यात किमान महिनाभराचा अवधी लागेल. नंतरच नवी लोकल मेन लाईनवर प्रवासी सेवेत येईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱयांनी दिली.
























































