कल्लोळ घालायला येतोय ‘लग्न कल्लोळ’, धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

 

मोहम्मद एस. बर्मावाला आणि डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे दिग्दर्शित ‘लग्न कल्लोळ’ या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमुळे चित्रपटाची उत्सुकता आता प्रचंड वाढली आहे. मल्टिस्टारर असलेला हा चित्रपट लग्नसंस्थेवर भाष्य करणार आहे. या चित्रपटात सिद्धार्थ जाधव, मयुरी देशमुख, भूषण प्रधान, विद्या करंजीकर, प्रिया बेर्डे, प्रतीक्षा लोणकर, सुप्रिया कर्णिक, अमिता कुलकर्णी, भारत गणेशपुरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मयुर तिरमखे फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे आण्णासाहेब रामचंद्र तिरमखे, मंगल आण्णासाहेब तिरमखे, डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे निर्माते आहेत. तर या चित्रपटाचे लेखन जितेंद्रकुमार परमार यांनी केले आहे.

लग्न म्हटले की घरात सगळीकडे गोंधळ असतोच. हाच गोंधळ आपल्याला ‘लग्नकल्लोळ’मध्ये पाहायला मिळणार आहे. मात्र यात अनेक ट्विस्ट असणार आहेत. यात एक नवरी आणि दोन नवरे दिसत आहेत. त्यामुळे आता हा कल्लोळ नेमका काय असणार आणि मयुरी कोणाच्या गळ्यात वरमाला घालणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला १ मार्चला मिळणार आहे. हा एक रॅामकॅाम चित्रपट आहे, जो प्रत्येकाने आपल्या कुटुंबासोबत पाहावा. दरम्यान, या चित्रपटातील गाण्यांनाही प्रचंड लोकप्रियता मिळत आहे.

चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक, निर्माते डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे म्हणले की, ’ कला क्षेत्राची मला मुळातच आवड असल्याने एखादी उत्तम कलाकृती प्रेक्षकांना द्यावी, हे आधीपासूनच मनात होते. त्यातूनच ‘लग्नकल्लोळ’ची निर्मिती झाली आणि या सगळ्या प्रवासात मला सर्वोत्कृष्ट अशी टीम लाभली. कलाकार, दिग्दर्शक, लेखक, संगीत, तांत्रिक बाबी या सगळ्यासाठी माझ्यासोबत इंडस्ट्रीतील नामंवत मंडळी जोडली गेली. यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. हा रॅामकॅाम चित्रपट असल्याने प्रेक्षकांना निश्चितच हसवेल. सोबतच यात भावनाही आहेत.’