
अखिल भारतीय मराठी नाटय परिषदेचे 100 वे नाटय संमेलन महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यात होणार असून नगर येथे 1 ते 3 मे 2020 या कालावधीत नाटय संमेलन आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती नाट्य परिषद मध्यवर्ती मुंबईचे अध्यक्ष प्रसाद कांबळी व प्रमुख कार्यवाह अभिनेते शरद पोंक्षे यांनी नगरमध्ये पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी नाट्य शाखेचे जिल्हा अध्यक्ष अमोल खोले, सहकार्यवाह सतीश लोटके, नियामक मंडळ सदस्य दिगंबर प्रभू, अशोक नारकर, सतीश शिंगटे, प्रवक्ता संजय घुगे नगर शाखेचे उपाध्यक्ष शशिकांत नजान उपस्थित होते.
नाटय संमेलनाच्या निमित्ताने अहमदनगर जिल्ह्यातील तालुका स्तरावर नाट्य जागर उपक्रम राबविण्यात येणार आहे. चार व्यावसायिक नाटके, नृत्य, नाटय, लोककला, संगीत, नाट्य दिंडी यासह विविध कलांचे सर्वोत्कृष्ट कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार आणि संमेलनाध्यक्ष जेष्ठ नाटककार, दिग्दर्शक जब्बार पटेल आहेत.
























































