
नाटककार विजय तेंडुलकर लिखित ‘घाशीराम कोतवाल’ हे अभिजात मराठी नाटक आता हिंदी रंगभूमीवर येत आहे. ‘घासीराम कोतवाल’ असे हिंदी नाटकाचे नाव आहे. नाटकात ज्येष्ठ हिंदी अभिनेते संजय मिश्रा हे नाना फडणवीस तर संतोष जुवेकर घाशीरामाची भूमिका साकारणार आहेत.
‘घाशीराम कोतवाल’चा पहिला प्रयोग होऊन (16 डिसेंबर 1972) आज 52 वर्षे पूर्ण झाली आहेत. हे नाटक दहा हिंदुस्थानी भाषांमधून आणि जगातील तीन भाषांमध्ये सादर झाले आहे. डॉ. जब्बार पटेल यांनी ‘घाशीराम कोतवाल’चे दिग्दर्शन केले होते. पेशवाईच्या काळात पुण्याचा कोतवाल राहिलेल्या घाशीरामावर हे नाटक आधारित आहे. नाटकाच्या विषयावरून वादही झाला होता. त्यामुळे नाटकाची लोकप्रियता वाढत गेली. आता हे नाटक हिंदीत येत आहे. हिंदी नाटकाचे दिग्दर्शन भालचंद्र पुबल आणि अभिजीत पानसे यांनी केलंय. अभिनेत्री उर्मिला कानिटकरचीही यात भूमिका आहे.
‘नाटक करण्याची फार मनापासून इच्छा होती, परंतु चित्रपटांमुळे वेळ मिळत नव्हता. ‘घाशीराम कोतवाल’ हे कालातीत नाटक आणि त्याचा अवकाश फार मोठा आहे. असं नाटक करायला मिळतंय हे नट म्हणून मला समृद्ध करणार आहे. – संजय मिश्रा, ज्येष्ठ अभिनेते