मराठी माणसानेच मराठी शाळांचे दूत व्हावे; ‘मराठीची शाळा कोण करतंय?’ परिसंवादातील सूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जागतिकीकरणामुळे इंग्रजी शाळांचे प्रस्थ वाढले असून मराठी पालकच आपल्या पाल्याला इंग्रजी शाळेत पाठवू पाहत आहेत. आजही मराठी शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत असले तरी इंग्रजी शाळेच्या तुलनेत भौतिक सोयीसुविधा पुरविण्यात आणि शाळा चकाचक करण्यात मराठी संस्थाचालक मागे आहेत. मराठी शाळांना अनुदान देण्यास सरकारी अनास्था आणि पालकांनी फिरवलेली पाठ यामुळे महाराष्ट्रात मराठीचे खच्चीकरण सुरू आहे. त्यामुळे मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व ओळखून मराठी माणसानेच मराठी शाळांचे दूत व्हावे, असा सूर मराठीची शाळा कोण करतंय या परिसंवादातून उमटला. 

स्वामीराज प्रकाशनाच्या वतीने मराठी आठव दिवसानिमित्त 27 जून रोजी दादर येथील शिवाजी मंदिर सभागृहात ‘मराठीची शाळा कोण करतंय?’ या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव, जनसहयोग फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रभाकर पवार, अभिनेता सुशांत शेलार, कवी डॉ. महेश केळुसकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समिरा गुजर यांनी केले. यावेळी स्वररंग प्रस्तुत ‘माय मराठी साजिरी’ हा अभिवाचनात्मक कार्यक्रमही सादर झाला. 

मराठी शाळेत शिकल्यावर इंग्रजी येणार नाही हा समज चुकीचा 

मराठी शाळेत शिकल्यावर इंग्रजी येणार नाही, हा समज चुकीचा असल्याचे ‘वयम्’ मासिकाच्या संपादिका शुभदा चौकर यांनी सांगितले. मराठीतून शिकल्यावर इंग्रजी येणार नाही हा न्यूनगंड बालकांमध्ये नाही तर पालकांमध्ये असून बालकांवरील अभ्यासाचे ओझे कमी करण्यासाठी त्यांना सहज समजेल अशा मातृभाषेतून शिक्षण होणे ही विद्यार्थ्यांची गरज असल्याचेही त्यांनी पुढे बोलताना सांगितले. 

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत होणाऱया आरटीईच्या 25 टक्के कोटा प्रवेशाचा सर्वाधिक फटका मराठी माध्यमाच्या शाळांना बसत असल्याचे आम्ही शिक्षक व मराठी शाळा संस्थाचालक संघाचे समन्वयक सुशील शेजुळे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना उत्तम भौतिक सोयीसुविधा पुरविण्यासाठी शाळांना वेतनेतर अनुदान मिळणे आवश्यक असून सर्वच सरकारचे मराठी शाळांकडे दुर्लक्ष झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. राज्यातील शैक्षणिक धोरणच धरसोड वृत्तीचे असून इंग्रजी शाळांना आमचा विरोध नाही, पण केवळ अनुदान द्यावे लागते म्हणून खासगी प्राथमिक मराठी शाळांकडे दुर्लक्ष करणे योग्य नसल्याचे शिक्षण संस्थाचालक संघटनेचे अध्यक्ष भाऊ कोरगावकर म्हणाले. 

परिसंवादातील ठळक मुद्दे 

  • मातृभाषेतून शिक्षण देणाऱया शाळेशेजारी इंग्रजी शाळा नकोच, असा कायदा होणे आवश्यक. 
  • राज्यातील सर्व बोर्डांच्या शाळांमध्ये मराठी विषय सक्तीने शिकविला जातोय का, याची तपासणी गरजेची. 
  • राज्यात मराठी माध्यमांच्या शाळेत शिकलेल्या उमेदवारांना गुणवत्तेनुसार नोकरीत आरक्षण. 
  • मराठी शाळेत मिळणारे गुणवत्तापूर्ण शिक्षण, राबविलेले उपक्रम यांचा प्रचार, प्रसार व्हायला हवा.