ज्येष्ठ साहित्यिक प्रा. भास्कर चंदनशिव यांचे निधन

marathi-writer-bhaskar-chandanshiv-dies

ज्येष्ठ साहित्यिक प्रा. भास्कर चंदनशिव यांचे लातूर येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले आहे. धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील हासेगाव येथील ते रहिवासी होते.

प्रा. भास्कर चंदनशिव यांचे शालेय शिक्षण जिल्हा परिषद शाळा कळंब येथे तर महाविद्यालयीन बीए पर्यंतचे शिक्षण अंबाजोगाई येथे झाले, त्यांनी एम ए मराठी विषयांमध्ये छत्रपती संभाजीनगर येथे केले. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आष्टी येथे जून 1972 मध्ये वरिष्ठ महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून नोकरीस प्रारंभकेला होता. त्यानंतर बरीच वर्षे त्यांनी वैजापूर येथे नोकरी केली. बलभीम महाविद्यालय बीड येथून 2005 मध्ये ते सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर ते कळंब येथे स्थायिक झाले.

“लाल चिखल “ही कथा विद्यापीठ, इयत्ता दहावी व बारावीच्या अभ्यासक्रमामध्ये होती. जांभळढव्ह, अंगार माती, नवी वारूळ, बिरडं, मरणकाळा हे त्यांचे गाजलेले कथासंग्रह, भूमी आणि भूमिका हा समीक्षा ग्रंथ तर रानसय हा ललित संग्रह गाजलेला होता यासह एकूण 14 ग्रंथ त्यांचे प्रकाशित झालेले होते. 28 वे मराठवाडा साहित्य संमेलन धाराशिवचे ते अध्यक्ष होते. राष्ट्रीय शेतकरी साहित्य संमेलनाचे ही त्यांनी अध्यक्ष स्थान भुषविले होते. अनेक शेतकरी व ग्रामीण साहित्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्षस्थान भूषविले होते. त्यांच्या साहित्याला महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर उप परिसर धाराशिव येथे विद्यापीठाच्या 21व्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 16 ऑगस्ट 2025 रोजी नुकताच त्यांना जीवन साधना पुरस्कार ही मिळाला होता. मराठवाडा साहित्य परिषदेचे धाराशिव शाखेचे ते मार्गदर्शक होते.